भाजपच्या '२०१८'च्या खेळीची धास्ती! महापालिकेतील जागा वाटपाचा पेच सुटेना; शिंदेसेना २५ जागांवर ठाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 11:14 IST2025-12-30T11:12:30+5:302025-12-30T11:14:08+5:30
महायुती की 'स्वबळ'? सस्पेन्स कायम

भाजपच्या '२०१८'च्या खेळीची धास्ती! महापालिकेतील जागा वाटपाचा पेच सुटेना; शिंदेसेना २५ जागांवर ठाम
सुनील पाटील
Jalgaon Municipal Corporation Election: जळगाव महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस असतानाही सत्ताधारी महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजप-शिंदेसेना-राष्ट्रवादी (अजित पवार) एकत्र लढणार की भाजप पुन्हा एकदा २०१८ प्रमाणे शेवटच्या क्षणी 'स्वबळाचा' नारा देऊन मित्रपक्षांना धक्का देणार? या चर्चेने सोमवारी राजकीय वातावरण तापले होते. रात्री उशिरापर्यंत बैठकांचे सत्र सुरू होते.
सोमवारी दिवसभर भाजप-शिंदेसेना आणि भाजप-राष्ट्रवादी अशा स्वतंत्र बैठकांच्या फेऱ्या पार पडल्या. मंत्री गिरीश महाजन यांनी दोन दिवसांपूर्वीच 'युती निश्चित; पण महायुती अनिश्चित' असे संकेत दिल्याने राष्ट्रवादीच्या (अजित पवार) गोटात अस्वस्थता आहे.
निष्ठावंतांना भीती?
जागा वाटपात मोठी भीती 'निष्ठावंतांना' वाटत आहे. प्रमुख नेत्यांच्या जवळचे कार्यकर्ते आणि नातेवाइकांना उमेदवारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. अशा परिस्थितीत वर्षानुवर्षे पक्षाचे झेंडे वाहणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जाण्याची दाट शक्यता आहे. यामुळे बंडखोरीची चिन्हे आहेत.
भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होण्याची भीती
जर युती किंवा महायुती झाली, तर अनेक दिग्गजांना उमेदवारीपासून मुकावे लागेल. अशा स्थितीत भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होण्याची भीती नेत्यांना सतावत आहे. त्यामुळे पक्षातील एक मोठा गट 'स्वबळावर लढण्यासाठी आग्रही आहे. एकीकडे महायुतीत गोंधळ असताना, दुसरीकडे महाविकास आघाडीने (शरद पवार गट व उद्धवसेना) जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करून आघाडी घेतल्याचे चित्र आहे. आता सर्वांचे लक्ष मंगळवारच्या घडामोडींकडे लागले आहे. भाजप 'मैत्री' निभावणार की पुन्हा एकदा 'एकला चलो रे'ची भूमिका घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
४८-२२-५चा फॉर्म्युला?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये भाजप ४८, शिंदेसेना २२ आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) ५ जागा असा संभाव्य फॉर्म्युला ठरला आहे. मंगळवारी दुपारी ३ पर्यंत कोणाला 'एबी फॉर्म' मिळतो, कोणाचा पत्ता कट होतो याकडे लक्ष लागले आहे.
'२०१८'च्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार ?
'२०१८'च्या निवडणुकीत भाजपने शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेला युतीचे आश्वासन दिले होते. अर्ज भरण्याच्या शेवटच्या काही तासांत 'स्वबळा'ची घोषणा करून सर्वांना चकित केले होते. यंदाही तशीच रणनीती आखली जात असल्याची शंका राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
शिंदेसेनेचा '२५'चा आकडा; राष्ट्रवादीची कोंडी?
शिंदेसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, आम्हाला २५ जागा देण्याचे भाजपने मान्य केले आहे, त्यापेक्षा एकही जागा कमी घेणार नाही. प्रसंगी ७५ जागांवर लढण्याची आमची तयारी आहे. दुसरीकडे, भाजप नेते आमदार सुरेश भोळे आणि मंगेश चव्हाण हे राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकरांशी स्वतंत्र चर्चा करत असले तरी, रात्री उशिरापर्यंत ठोस काही निष्पन्न झालेले नव्हते. शिंदेसेना व राष्ट्रवादी दोघांमध्ये काही प्रभागांवर चर्चा अडून बसली होती. मंगळवारी, सकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल, असे देवकर यांनी 'लोकमत'ला सांगितले.