सततच्या वाचनातून लिहिते झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 01:51 AM2019-06-01T01:51:19+5:302019-06-01T01:51:49+5:30

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘माझी लेखन प्रेरणा’ या सदरात लिहिताहेत कथाकार अश्विनी करंके...

It has been written from continuous reading | सततच्या वाचनातून लिहिते झाले

सततच्या वाचनातून लिहिते झाले

Next

सन २००० साली पदवी घेऊन कॉलेज सोडलं, पण वाचनात खंड पडू दिला नाही. त्यातच २००३ साली माझ्या मिस्टरांचा लेख नियतकालिकात झळकला. तेव्हापासून मी थोडा लिखाणाचा प्रयत्न सुरू केला. ‘हुंडा’ या सामाजिक विषयावर एक लेख लिहिला. मात्र तो व्यवस्थित मांडलाय की नाही हे माझं मलाच कळत नव्हतं. मी घाबरत-घाबरतच लेख मिस्टरांना दाखविला. त्यांनी तो वाचून त्यातील थोडी शब्दरचना स्वत: करून लिखाणासाठी प्रोत्साहीत केलं. त्यानंतर गावातील वाचनालयातून पुस्तकं वाचायला उपलब्ध करून दिली. त्यात कादंबरी, कथासंग्रह होते. मला वाचनाची आवड तर होती, पण पुढे-पुढे नियमित विविध पुस्तके उपलब्ध होत असल्याने वाचनात विविधता आणली. यातच सन २००५ उजाडले आणि मिस्टरांनी लिखाणासाठी प्रयत्न करण्याविषयी सांगितलं. आधी तर मनात भीती होती की, मी लिखाण करू शकेन का? पण त्यांनी प्रोत्साहन दिलं की, तू लिहू शकतेस, प्रयत्न करून बघ. मी तुझ्यासोबत आहेच.’ मग काय? सतत चार महिने फक्त डोक्यात आलेले विचार माझ्या शब्दात कागदावर उतरविले. लेखणी चालत होती, शब्द उमटत होते, कागदं भरत होती. पण विषयाला धरुन हवं तसं लिखाण मात्र होत नव्हतं. एका विषयाला धरुन त्यात कथानक साकारण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यातच एक मनासारखा विषय मिळाला. निपुत्रिक असणाऱ्याला समाज कसा वागवतो? आणि मग पहिली कथा साकारली ‘दत्तक’. तोवर दिवाळी अंक कथा स्पर्धा जाहीर झालेली होती. मी ती कथा स्पर्धेसाठी पाठवली. माझी पहिलीच कथा द्वितीय पारितोषिक प्राप्त म्हणून प्रसिद्ध झाली. वाचकांना विषय आणि मांडणी खूपच आवडली. अनेक वाचकांनी दूरध्वनी तसेच पत्रव्यवहारच्या माध्यमातून माझ्या कथेचं कौतुक केलं. यातून प्रोत्साहन मिळत गेलं. नवीन काही तरी करण्याची ऊर्जा या प्रोत्साहनाच्या माध्यमातून मिळत गेली. त्यानंतर मात्र लिखाणाची गोडी लागली. विविध विषयांकडे मी चौकस दृष्टीने पाहून स्थानिक, ग्रामीण, सामाजिक विषयावर लिखाण सुरू केलं. आज माझ्या अनेक कथांना विविध स्पर्धांमध्ये पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत हे लिखाण असंच सुरू रहावं, अशी इच्छा आहे. कारण यातून सकारात्मक ऊर्जा मिळते. प्रोत्साहन मिळतं. यापेक्षा आणखी दुसरं काही पाहिजे?
-अश्विनी करंके, मलोणी, ता.शहादा, जि.जळगाव

Web Title: It has been written from continuous reading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.