Ira, Google and we | इरा, गूगल आणि आम्ही
इरा, गूगल आणि आम्ही

हाय गूगल असं म्हणत आमची इरा हिरमुसत म्हणाली, ‘आई, ‘हे गूगल’ होत नाहीये! सांग ना रेंजला’ आता ना इथे टीव्ही ना मोबाइल मग हा गूगल हिला दिसला तरी कुठे?
काहीशा कॅज्युअल नजरेने आम्ही एकमेकांकडे पाहिलं, पडलेला प्रश्न फारसा महत्वाचा नाही म्हणून माना डोलावल्या आणि परत कामाला लागलो. पण खरंच, किती पद्धतशीरपणे कुठे अडल्यावर ‘हे भगवान’, ‘हे पांडुरगा’ असे वापरले जाणारे शब्दप्रयोग ‘हे गूगल’ने पार बदलून टाकले आहेत याची अचानक जाणीव झाली. ह्याची सुरुवात झाली ती दसऱ्याला, जेव्हा आमच्या घरात डब्बा टीव्ही काढून एंड्रॉइड स्मार्ट टीव्ही आला. डेमो देणारा आम्हाला ‘हे गूगल’ म्हणून टीव्ही कसा आपल्या आदेशाचा गुलाम आहे हे दाखवू लागला. नव्याचे नऊ दिवस हे इथे मात्र अपवादात्मक वाटले आणि बघता बघता घरी येईल त्याला ‘हे गूगल’, ‘हे गूगल’ करून दाखवण्याच्या नादात आम्हीच कधी त्याचे गुलाम झालो ते आम्हालाही कळलं नाही. असंच नाही स्मार्ट म्हणतात ह्या पठ्ठ्याला! असो. सध्या ‘अमूकला मराठीत काय म्हणतात’पासून तमूक पदार्थांची रेसिपी आणि जगाच्या कानाकोपºयात काय चाललंयपासून ते कुठल्या गल्लीत कोण राहतंयपर्यंत नाना प्रश्नांची, नाना कलांची आणि कळांची उकल हा गूगल बाबा सहजतेने करतो म्हटल्यावर ‘नेक्स्ट टू गॉड’च भासणार ना? बरं, कृत्रिम का असेना पण ही बुद्धिमत्ता दिसत असल्याने सिद्ध वगैरे करण्याचे चॅलेंज अजून तरी कोणीही दिलेले नाही. किती व्यापून टाकलंय ना ह्या तंत्रज्ञानाने आपल्या आयुष्याला! घरातल्या ताई-दादाला स्पेलींग विचारणारे आपण ह्या गूगलचं बोट धरुन आपल्याच नट्यांना पारखे तर झालो नाही ना? पण मग शाळेनंतर हरवलेले आपले मित्र, मैत्रिणी ह्या गूगलनेच तर शोधून दिलेत आपल्याला. एकिकडे आपला असिस्टंट झालेला हा गूगल आपल्याला आळशी बनवतो तर ज्ञानाचा खजिनाही उघडतो पण कुठलं ज्ञान कुणी घ्यावं हे मात्र ज्याचं त्यानं ठरवायला हवं.
डिजिटल क्रांतीची वेस ओलांडून आपण केव्हाच पलिकडे आणि फार पुढे आलो आहोत, तेव्हा ‘आमच्या वेळी’चं ओझं घेऊन फरफटत जाण्यापेक्षा ह्या घसरगुंडीवरुन सुसाट निघूयात; तंत्रज्ञानाचे कठडे घट्ट धरून. हे विठ्ठला! कलीयुगातील हा तुझाच तर अवतार नाही ना? आणि अलेक्सा, सिरी ह्यांचं काय? # हाय गूगल, बघू या.
-नीरज पद्माकर देशपांडे, नंदुरबार

Web Title: Ira, Google and we

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.