मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'रोड शो'व्दारे महायुतीचे शक्तीप्रदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 14:24 IST2026-01-07T14:11:18+5:302026-01-07T14:24:46+5:30
३८ मिनिटांत शहरातील मुख्य बाजारपेठेतून फिरले मुख्यमंत्री; कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'रोड शो'व्दारे महायुतीचे शक्तीप्रदर्शन
जळगाव : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीने आपले शक्तिप्रदर्शन केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवार, ६ जानेवारी रोजी शहरात भव्य 'रोड शो' पार पडला. यावेळी महायुतीच्या उमेदवार व कार्यकर्त्याकडून मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत करण्यात आले, संपूर्ण बाजारपेठ परिसरातून खुल्या वाहनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावकरांना अभिवादन केले.
रोड शोची अधिकृत वेळ दुपारी ३ वाजेची असली तरी, दोन तासांच्या विलंबानंतर सायंकाळी ५:०२ वाजता शिवतीर्थ मैदानापासून या रॅलीला सुरुवात झाली.
तत्पूर्वी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महायुतीच्या वतीने २१ फटाक्यांच्या बॉक्सची आतषबाजी करत मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.
३८ मिनिटांचा रोड शो...
मुख्यमंत्र्यांच्या रोड शो सायंकाळी ५.०२ वाजता शिवतीर्थ मैदानापासून सुरू होऊन नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौक, विसनजी नगर मार्गे पुन्हा शिवतीर्थ मैदानाजवळ सायंकाळी ५:४० वाजता समाप्त झाला. ३८ मिनिटांत मुख्यमंत्र्यांची झलक पाहण्यासाठी जळगावकरांनी गर्दी केली होती.
अजित पवार गटाचे नेते मात्र दूरच..
रोड शो महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी काढण्यात आला, मात्र या रॅलीतून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी व नेते दुर राहिल्याचे दिसून आले. रोड शो नवीपेठेत आल्यानंतर त्या ठिकाणी माजी मंत्री गुलाबराव देवकर हे रोड शोमध्ये सहभागी झाले.
'बड्या' नेत्यांची उपस्थिती आणि उमेदवारांची 'पायी' रॅली
या रोड शो दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या खुल्या वाहनात पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, अमोल जावळे, माजी मंत्री गुलाबराव देवकर उपस्थिती होती. या रोड शो दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या वाहनाच्या पुढे महायुतीचे सर्व उमेदवार पायी चालत होते.
बंडखोरांना जनता थारा देणार नाही: बंडखोरांना जनता थारा देणार नाही. तसेच विकासकामांच्या दर्जाबाबत तक्रार असल्यास 'थर्ड पार्टी ऑडिट' करून सुधारणा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. घराणेशाहीच्या आरोपावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, पक्षाने नवीन उमेदवारांबाबत कडक पॉलिसी ठरवली होती, केवळ एक-दोन अपवादात्मक ठिकाणी अर्ज भरले गेले होते. त्यामुळे ऐनवेळी उमेदवार देणे शक्य झाले नाही, असे स्पष्टीकरण देताना त्यांनी आमदार सुरेश भोळे यांच्या मुलाच्या उमेदवारीची पाठराखण केली.
जळगावला विकसित शहरांच्या श्रेणीत नेणारच
गेल्या पाच वर्षांत जळगावच्या विकासासाठी महायुती सरकारने तिजोरी खुली केली. पाणीपुरवठा, मलनिस्सारण असे कोट्यवधींचे प्रकल्प आम्ही मार्गी लावले. आता जळगावला देशातील विकसित शहरांच्या श्रेणीत आणण्याचा आमचा मानस असून, त्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. जळगावात महायुती उमेदवारांच्या प्रचारादरम्यान आयोजित रोड शो दरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. मंत्री गिरीश महाजन, संजय सावकारे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी खा. डॉ. उल्हास पाटील, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकी पाटील उपस्थित होते.