जळगाव मनपाच्या तिजोरीच्या चाव्या डॉ.चंद्रशेखर पाटलांकडे, महिला बालकल्याण सभापतीपदी सिंधू कोल्हेंना संधी, उद्या अधिकृत घोषणा
By सुनील पाटील | Updated: February 26, 2026 15:39 IST2026-02-26T15:38:33+5:302026-02-26T15:39:02+5:30
Jalgaon Municipal Corporation News: महापालिकेच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापती पदाचा सस्पेन्स अखेर संपला आहे. महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आता डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्याकडे सोपवण्यात आल्या आहेत.

जळगाव मनपाच्या तिजोरीच्या चाव्या डॉ.चंद्रशेखर पाटलांकडे, महिला बालकल्याण सभापतीपदी सिंधू कोल्हेंना संधी, उद्या अधिकृत घोषणा
- सुनील पाटील
जळगाव - महापालिकेच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापती पदाचा सस्पेन्स अखेर संपला आहे. महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आता डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्याकडे सोपवण्यात आल्या आहेत. सोबतच, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी शिंदे सेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका सिंधू कोल्हे यांना संधी देण्यात आली आहे.गुरुवारी दुपारी नगरसचिव सतीश शुक्ला यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी तीन, तर सिंधू कोल्हे यांनी दोन अर्ज सादर केले.
महापालिकेत महापौरपदानंतर सर्वात महत्त्वाचे स्थायी समितीचे सभापती पद असते. या पदावर कोण विराजमान होणार याकडे लक्ष लागून होते. महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी महापौर नितीन लढ्ढा यांचेही नाव चर्चेत होते. भाजपने गुरुवारी डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. नगरसचिव शुक्ला यांच्याकडे पाटील यांनी तीन तर महिला व बालकल्याण सभापती पदासाठी सिंधू कोल्हे यांनी दोन अर्ज दाखल केले. यावेळी महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, भाजपचे गटनेते प्रकाश बालाणी, शिंदे सेनेचे गटनेते विष्णू भंगाळे, नितीन बरडे, नितीन लढ्ढा, दीपक सूर्यवंशी, अरविंद देशमुख, नरेंद्र पाटील, गणेश सोनवणे, डॉ.अमृता सोनवणे, प्रतिभा देशमुख, गायत्री राणे, सुरेखा तायडे आदी उपस्थित होते.
आज विशेष सभेत अधिकृत घोषणा
दोन्ही सभापती निवडीसाठी आज २७ रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल पिठासीन अधिकारी असतील. या सभेत दोन्ही नवनियुक्त सभापतींच्या नावांची औपचारिक घोषणा केली जाईल.