“विलासराव देशमुख यांच्या आठवणी कोणीही पुसू शकत नाही”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 06:45 IST2026-01-07T06:44:40+5:302026-01-07T06:45:22+5:30
काँग्रेसविरुद्ध् लढत असलो तरी ज्यांनी महाराष्ट्रात उत्तम काम केले त्यात विलासराव आहेत

“विलासराव देशमुख यांच्या आठवणी कोणीही पुसू शकत नाही”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्याविषयी सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या स्मृती कोणीही पुसू शकत नाही आणि पुसणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मंगळवारी फडणवीस जळगावात आले होते. रोड शो पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. चव्हाणांना केवळ नव्या रेकॉर्ड बद्दल बोलायचे होते. नवीन रेकॉर्ड तयार करा, असेच रवींद्र चव्हाण बोलले आहेत. निवडणुकीच्या काळात सहसा कोणी दिलगिरी व्यक्त करत नाही, मात्र चव्हाणांनी मोठ्या मनाने स्पष्टीकरण देऊन दिलगिरी व्यक्त केली आहे. कारण त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. आम्ही काँग्रेसच्या विरुध्द लढत असलो तरी ज्यांनी महाराष्ट्रात उत्तम काम केले, त्यात विलासराव आहेत. ते कोणालाही नाकारता येणार नाही.
काँग्रेसच्या काळात धुळे बेहाल : काँग्रेसच्या सत्ताकाळात धुळे शहराला ५० कोटींचा निधी मिळणेही कठीण होते, मात्र भाजप सरकारने शहराच्या विकासासाठी हजारो कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आता आपल्याला धुळ्याला आधुनिकतेकडे न्यायचे असून, शहराचे वर्तमान बदलण्याची ताकद केवळ मोदीजींच्या नेतृत्वात आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी येथील जाहीर सभेत तोफ डागली.
विरोधकांकडे ना नीती, ना योग्य नियत
नागपूर : आम्ही केवळ विकासाचे राजकारण करत असून, प्रचारातदेखील त्याच मुद्द्यांवर आमचा भर आहे. परंतु, विरोधकांकडे कुठलीही नीती, योग्य नियत व काम करण्याची ताकददेखील नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोरगाव येथे प्रचारसभेत केली. नागपुरात ज्या प्रकारचा विकास झाला आहे, तो सांगण्याची गरज नाही. जनतेला तो डोळ्याने दिसत आहे. आता नागपूरला देशातील सर्वोत्तम शहर करू, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
सावरकर आणि महायुतीची भूमिका
अजित पवार यांनी सावरकरांच्या विचारांना विरोध केल्याच्या चर्चेवर बोलताना फडणवीस म्हणाले, की त्यांनी तसा विरोध केलेला नाही. आमची भूमिका सावरकरांबाबत अगदी स्पष्ट आणि पक्की आहे. सावरकरांचा अपमान किंवा विरोध आम्हाला कदापि मान्य नाही.