Voting in polling booth increases ... | भोकरदनमध्ये वाढला मतदानाचा टक्का...

भोकरदनमध्ये वाढला मतदानाचा टक्का...

लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : भोकरदन विधानसभा मतदार संघात या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे. सोमवारी पावसाने उघडीप दिल्याने मतदार संघात सर्वत्र मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले. त्यामुळे यंदा मतदानाचा टक्का वाढला असून, सरासरी ६९.३१ टक्क्यापर्यंत मतदान झाले.
भोकरदन विधानसभा निवडणुकीसाठी ३२२ मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजल्यापासून मतदानास सुरूवात झाली. सकाळपासूनच मतदार संघातील मताची टक्केवारी वाढत होती. दुपारनंतर मतदारांनी मतदान केंद्रासमोर रांगा लावल्या होत्या. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६५ टक्के मतदान झाले होते. रात्री आठ वाजेपर्यंत ६९.३१ टक्क्यापर्यंत मतदान झाले आहे.
जालना मतदारसंघात शांततेत मतदान
जालना : जालना विधानसभा मतदारसंघात सोमवारी शांततेत मतदान पार पडले. परंतु, वारंवार वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेक ठिकाणी अडचणी आल्या.
जालना मतदारसंघात सोमवारी सकाळपासूनच मतदानास सुरुवात झाली. सकाळी पाऊस असल्यामुळे मतदार केंद्रांबाहेर गर्दी नव्हती. मात्र, पाऊस उघडल्यानंतर मतदारांनी मतदान करण्यास पसंती दिली. सकाळी नऊ वाजेपर्यंत सात टक्के मतदान झाले. यानंतर मतदानाची टक्केवारी वाढली. ११ वाजेपर्यंत १८ टक्के तर दुपारी १ वाजेपर्यंत ३० टक्के मतदान झाले. ३ वाजेपर्यंत ४२ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर संथगतीने मतदान झाले. पाच वाजेपर्यंत ५२ टक्के मतदान झाले. १ लाख ७२ हजार ७२० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. रात्री आठ वाजेपर्यंत ५४.९० टक्के मतदान झाले.
बदनापूर मतदारसंघात ६७़६२ टक्के मतदान
बदनापूर : बदनापूर विधानसभा मतदारसंघात पावसामुळे अनेक मतदान केंद्रांवर अडचणी आल्या. मात्र, दुपारनंतर मतदारांनी मतदान करण्यासाठी बुथवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सायंकाळी पाच वाजेपर्यंत बदनापूर विधानसभा मतदारसंघात २ लाख ८ हजार १३८ मतदारांनी मतदान केले. एकूण ६७.६२ टक्के मतदान झाले.
बदनापूर विधानसभा मतदारसंघात सुरूवातीच्या पहिल्या दोन तासात मतदारांनी मतदान करण्यास निरूत्साह दाखविला. त्यामुळे सकाळी ९ वाजेपर्यंत मतदारसंघात केवळ ६.८३ टक्के मतदान झाले़ त्यानंतर मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी करण्यास सुरूवात केली़ त्यामुळे पुढील दोन तासांच्या मतदानात वाढ झाली. सकाळी ९ ते ११ दरम्यान ४४ हजार ५८८ पुरुष व २० हजार ४२४ महिला अशा एकूण ६५ हजार १२ मतदारांनी मतदान केले.
परतूर मतदारसंघात मतदारांचा उत्साह
परतूर : परतूर विधानसभा मतदारसंघात सकाळी पाऊस असल्याने दुपारी १२ वाजेनंतर मतदानाला वेग आला. रात्री आठ वाजेपर्यंत परतूर मतदारसंघात ६७.६६ टक्के मतदान झाले. दरम्यान, १७ व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्या होत्या.
परतूर मतदारसंघात सोमवारी सकाळी पाऊस सुरु होता. पावसाचा मोठा परिणाम मतदानावर दिसला. पावसामुळे सकाळी आठ वाजेच्या दरम्यान मतदार मतदान करण्यासाठी बाहेर पडले. आठ वाजेच्यानंतर मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी मतदारांनी गर्दी केली होती. दुपारी १ वाजेपर्यंत ३२. ७२ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मतदान केंद्राबाहेर मतदारांनी गर्दी केली. त्यामुळे ३ वाजेपर्यंत ४८.७८ टक्के मतदान झाले. रात्री आठ वाजेपर्यंत ६७.६६ टक्के मतदान झाले.
३३० मतदान केंद्रांवर ७३ टक्के मतदान
घनसावंगी : घनसावंगी विधानसभा मतदार संघातील ३३९ मतदान केंद्रावर सोमवारी शांततेत मतदान झाले. सोमवारी पहाटे पाऊस झाल्यानंतरही सर्वत्र उत्साहात मतदान झाले.
घनसावंगी मतदार संघात १३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सोमवारी सकाळी ९ वाजेपर्यंत ७ टक्के मतदान झाले होते. ११ वाजेपर्यंत २१ टक्के, दुपारी १ वाजेपर्यंत ३८ टक्के, ३ वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान झाले. तर रात्री आठ वाजेपर्यंत ७३.०५ टक्के मतदान झाले.

Web Title: Voting in polling booth increases ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.