Nationalist leaders pay more attention to Ghanaswangi .. | घनसावंगीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिले अधिक लक्ष..
घनसावंगीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिले अधिक लक्ष..

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अंबड आणि घनसावंगी या दोन तालुक्यांमध्ये साधारणपणे १९९९ पासून आमदार राजेश टोपे यांचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि आ. राजेश टोपे यांचे वडील स्व. अंकुशराव टोपे यांच्यात पूर्वापार सख्य होते. पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर अंकुशराव टोपे यांनी या भागाचा विकास केला आणि राजेश टोपे हे देखील याच पावलावर पुढे जात आहेत. त्यामुळे अत्यंत अटीतटीच्या या मतदार संघाकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अधिकचे लक्ष केंद्रीत केले आहे.
गेल्या दोन महिन्यांचा विचार केल्यास संघर्ष यात्रा तसेच जालन्यात ज्येष्ठ नेते शरद पवारांची सभा, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची उमेदवारी अर्ज भरताना असलेली उपस्थिती, खा. अमोल कोल्हे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आदी दिग्गजांनी घनसावंगीचा दौरा करून मोठी वातावरण निर्मिती केली आहे. यावेळी काँग्रेस सोबत असल्याने याचाही लाभ आ. टोपेंना या निवडणुकीत होणार आहे.
शरद पवार यांच्या रविवारी झालेल्या सभेच्या वेळी आ. राजेश टोपे हे भावनिक झाले होते. त्यांनी भाषणाच्या माईक जवळ डोके टेकवून शरद पवारांसमोर नतमस्तक असल्याचे सांगितले. या त्यांच्या कृतीने सभेनंतर बरीच चर्चा झाली. घनसावंगी, अंबड आणि जालना या तीन तालुक्यांमध्ये हा मतदारसंघ विभागला आहे. त्यामुळे मतदारसंघाचा विस्तार लक्षात घेता टोपे यांनी फार पूर्वीपासून येथे निवडणुकीचा सराव अर्थात रणनीती निश्चित केली आहे. प्रत्येक गावात जाऊन तेथील प्रतिष्ठितांसह सामान्य जनतेशी असलेली त्यांची नाळ घट्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसत आहे. अंकुशराव टोपे यांनी गोदावरी काठाचे महत्त्व ओळखून अंकुशनगर येथे २५ वर्षांपूर्वी समर्थ साखर कारखान्याची निर्मिती केली. आज या कारखान्यासह तीर्थपुरीजवळ सागर सहकारी साखर कारखानाही उभा केला. या भागातील ऊस पट्ट्यात याचा मोठा लाभ झाला. बँक, शिक्षण आणि कौशल्य विकास याला प्राधान्य देत पुढे सतत १२ वर्षे मंत्रिमंडळात राहिलेल्या आ. टोपे यांनी केलेल्या कार्याचा गौरवही खुद्द शरद पवार यांनी रविवारी आपल्या भाषणातून केल्याने घनसावंगी मतदार संघात कुठल्याही परिस्थितीत ही जागा जिंकण्यासाठी राष्ट्रवादीने व्यूहरचना आखली आहे.

Web Title: Nationalist leaders pay more attention to Ghanaswangi ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.