नेदरलँडस मध्ये गणेशोत्सवाद्वारे "वसुधैव कुटुंबकम" चे सादरीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 08:29 PM2023-09-30T20:29:13+5:302023-09-30T20:29:40+5:30

विचार आणि लेखणी समाज प्रबोधनाचे किती प्रभावी माध्यम ठरू शकतात "याची देही याची डोळा"स्वतः घेतलेला अनुभव म्हणजे आमचा या वर्षीचा गणेशोत्सव २०२३...

Presentation of "Vasudhaiva Kutumbakam" by Ganeshotsav in Netherlands | नेदरलँडस मध्ये गणेशोत्सवाद्वारे "वसुधैव कुटुंबकम" चे सादरीकरण

नेदरलँडस मध्ये गणेशोत्सवाद्वारे "वसुधैव कुटुंबकम" चे सादरीकरण

googlenewsNext

- महेश देवळे, आईंधोवन, नेदरलँडस

१८९४ ला पुण्यात लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरूवात केली. गणेशोत्सव आणि शिवजयंती साजरी करण्यापाठीमागे जनतेत एकजुटता निर्माण करणे हे खरे कारण होते. कारण ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी भारतीयांनी एकत्र असणे लोकमान्य टिळकांना महत्वाचे वाटत होते.हा विचार लोकमान्य टिळकांनी मांडून आता १३० वर्षे होत आहेत.. पण या अनुभवानुसार आजकालच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात पण "जुने तेच सोने".. असेच म्हणावे लागेल.

त्याचे झाले असे की, आईंधोवन मित्र मंडळात आपण दर वर्षी गणेशोत्सव साजरा करतो. आम्ही या वर्षी गणपतीची सार्वजनिक मिरवणूक काढण्याचा चंग बांधला होता व तो प्रत्यक्षात आणण्यासाठी कंबर कसली होती. आपला फक्त मिरवणुकीचा कार्यक्रम करण्याचे ठरले होते.कार्यक्रमाच्या अगोदरचे प्रमोशन करावायचे म्हणून एक लेख लिहिला व त्यामधील हा लोकमान्य टिळकांचा विचार सर्वांना अत्यंत समर्पक वाटला व तेथून पुढे खऱ्या गोष्टीला सुरुवात झाली...

सर्वसाधारणपणे भारताबाहेरील प्रत्येक देशात वेगवेगळ्या भाषांचे स्वतंत्र मंडळ असतात व या सर्वांचे एक भारतीय मंडळ असते. असे साहजिकच प्रत्येक मोठ्या शहरात असते. सर्व विविध भाषिक मंडळी आपापले सण उत्सव आपल्या भारतातील स्थानिक राज्यातील चालीरीती प्रमाणे साजरे करतात व राष्ट्रीय सण सर्व भारतीय एकत्र साजरे करतात. नेदरलँड मध्ये ही असेच चालत आलेले आहे.

येथील तेलुगू मंडळींनी " स्टिचिंग वसुधैव कुटुंबकम" नावाने मंडळ सुरू केले व तिरुमला तिरुपती देवस्थानच्या बालाजीच्या मंदिराची स्थापना काही वर्षांपूर्वी केली आहे.तिथे ते पण गणपतीची षोडशोपचार प्रतिष्ठापना व विसर्जन करतात.

त्यांनी आमच्या मंडळाला प्रतिष्ठापनेसाठी आमंत्रण दिले. त्यामधून असा विचार पुढे आला की भारतीय म्हणून त्यांचाच गणपती आपण आपल्या पहिल्या वहिल्या मिरवणुकीत घेऊयात व इतर सर्व भारतीय भाषिक मंडळींना पण सहभागी करून घेऊयात व विसर्जन करण्यासाठी सर्वजण एकत्र भारतीय म्हणून त्यांच्याकडे जाऊयात. तेलुगु मंडळींशी बोलणे झाले व कार्यक्रमाची पूर्णपणे एकत्र रूपरेषा आखण्यात आली. सर्व इतर भाषिक तमिळ, मल्याळम, गुजराती समाज, कर्नाटक, उत्तर भारतीय, बंगाली मंडळांना निमंत्रण एकत्र धाडण्यात आली व सर्वांना आमंत्रित करण्यात आले. अशा प्रकारे प्रतिष्ठापना,मिरवणूक व विसर्जन याची जय्यत तयारी सुरू झाली. 

मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर, लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया...या सुंदर अशा शायरी प्रमाणे प्रचंड जनसमूह अगदी थोड्या काळात आपोआप जोडल्या गेला. अगदी ही श्रींची इच्छाच म्हणावी लागेल.!

तेलगू मंडळींनी प्रतिष्ठापनेसाठी ८० किलो शाडूची मातीची अतिशय सुबक अशी श्री गणेशाची मूर्ती बेल्जियम येथून तयार करून घेतली. महाराष्ट्र मंडळींचे ४० जणांचे लेझीम पथक अगदी दोन-तीन आठवड्यात पूर्णपणे सराव करून तयार झाले. त्यासाठी दोन बॅग भरून लेझीम भारतातून मागवण्यात आले. सर्वांनी भारतीय पारंपारिक पोशाखा बरोबर महाराष्ट्रीयन फेटे ही बांधण्याचे ठरवण्यात आले. मग काय फेटेही पुण्यातून आयात करण्यात आले. एकमेकांना फेटे बांधण्याचा व प्रशिक्षणाचा उत्साह सर्वांमध्ये संचारला व त्यांचा एक ग्रुपही करण्यात आला. रमणबाग युवा मंच यांच्याशी अगोदरच संपर्क करून पथक व कार्यक्रमाची नियोजित आखणी करण्यात आलेली होतीच. फक्त ढोल ताशा वाजवण्यासाठी उत्साही मंडळी युरोपातील एका देशातून दुसऱ्या देशात दोन ते तीन दिवसासाठी जाऊ शकतात व त्यांची व्यवस्था आपल्या येथील सर्व मंडळी स्वतःच्या घरी करू शकतात, हे सर्वच अद्भुत आहे एखाद्या पारंपारिक लग्न सोह ळ्याप्रमाणे!!. किंबहुना आज-काल च्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीच्या लग्न सोहळ्यात पण एवढे होणे शक्य नाही..! लहान मुले-मुली यांचे नाच व भारतीय पारंपारिक फॅशन शो, विविधतेतून एकात्मता असे दाखवणारे भारतातील वेगळ्या प्रांतातील डान्स परफॉर्मन्स, असे सर्व जणांचे वेगवेगळे ग्रुप करण्यात आले. सर्वांना आपल्या भारतीय पदार्थांचा आस्वाद घेता यावा म्हणून फूड स्टॉलचा पण एक ग्रुप करण्यात आला.. इन्फ्रास्ट्रक्चर, स्पॉन्सर्स, केटरिंग, क्राउड कंट्रोल, सिक्युरिटी, यांचे पण वेगवेगळे ग्रुप करण्यात आले.

प्रतिष्ठापनेचा दिवस उजाडला, तेलुगु मंडळींनी गणपतीची प्रतिष्ठापना केली व मराठी मंडळींनी आरती व अथर्वशीर्षाचे अकरा आवर्तने केली. सर्वांनी आपापल्या घरून यथोचित पणे नेवैद्य तयार करून आणले. कार्यक्रम झाल्यानंतर सर्व मंडळींनी एकत्रपणे याचा प्रसाद म्हणून मनसोक्त आस्वाद घेतला. अगदी रोज असे पाच दिवस चालत राहिले. २३ सप्टेंबर २०२३, पाच दिवसाच्या गणपतीच्या मिरवणुकीचा व विसर्जनाचा दिवस आला. विविधतेत एकात्मता या विचारात भर म्हणून की काय येथील स्थानिक डच  मंडळीपण सहभागी झाली. तेलुगू मंडळींनी "स्टिचिंग वसुधैव कुटुंबकम" हे ठेवलेले मंडळाचे नाव अतिशय समर्पकपणे लागू झाले. त्यांनी मिरवणूक प्रायोजित पण केली आणि स्थानिक माध्यमांद्वारे प्रसारित पण केली.. एवढ्या सहजपणे सर्वांना स्वीकारण्याची कला येथील लोकांमध्ये नक्कीच आहे. विविधतेतून एकात्मता भारतीय संस्कृतीचे डान्स व लहान मुलांचे फॅशन शो, हे परफॉर्मन्स पार पडल्यानंतर शेवटची आरती झाली व मिरवणुकीला सुरुवात झाली..समोर बॅनर, त्यामागे लेझीमची पथक, त्यामागे ढोल ताशा पथक व त्यानंतर गणपतीची पालखी अशी लयबद्ध पणे वाटचाल सुरू झाली. ढोल ताशाचा व लेझीम चा आवाज आसमंतात प्रचंड घुमत होता.. येथील मंडळींना हा अनुभव नवीनच होता.. त्यामुळे प्रत्येक जण काय चालले आहे हे बघण्यासाठी उत्सुकतेने गोळा होत होते व गणपती व कार्यक्रमाची चौकशी करत होते.भारतीय पोशखातील सर्व भारतीय मंडळी तर होतीच.. एक अंदाज यावा म्हणून सर्वांचे फ्री रजिस्ट्रेशन घेतले होते. ७०० ते ८०० रजिस्ट्रेशन होती.पण हा जमा होत चाललेला जनसमुदाय विलक्षणच होता व आकडा अंदाजे २००० च्या पुढे नक्कीच गेला असेल.. अशा प्रकारे हा जल्लोष २ ते ३ तास अखंड चालू होता.. मिरवणुकीची सांगता झाली व आम्ही मूर्ती विसर्जनासाठी तेलुगु मंडळींच्या मंदिरात दाखल झालो.. तेथे तिरुपतीच्या देवस्थानाच्या प्रथेप्रमाणे प्रसादाच्या लाडूचा लिलाव झा ला. हा १० किलो चा लाडूचा लिलाव शेवटी एका भाविक कुटुंबाने ३२०० पेक्षा जास्त युरो देऊन जिंकला व लगेचच तो प्रसाद म्हणून सर्वांना वाटण्यात पण आला. ८० किलोच्या च्या शाडूच्या मूर्तीचे तेथील हौदात विसर्जन करण्यात आले. "गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या" असे म्हणत व पुढील वर्षी असेच नवनवीन उपक्रम आखण्याची मनाशी खूणगाठ बांधून साश्रू नयनाने गणरायाला निरोप देण्यात आला. 

अशा प्रकारे लोकमान्य टिळकांचा सर्व भारतीयांना एकत्र आणण्याचा विचार सार्थी लागला.. तसेच परदेशी मंडळींना सहभागी करून "वसुधैव कुटुंबकम" हा भारतीय संस्कृतीचा गाभा असलेला विचार पण समर्पकपणे सिद्ध झाला..

Web Title: Presentation of "Vasudhaiva Kutumbakam" by Ganeshotsav in Netherlands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.