पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 13:42 IST2025-06-12T13:41:40+5:302025-06-12T13:42:08+5:30
सामान्य जनतेसाठी फारसा दिलासा नसतानाही, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासाठी करण्यात आलेल्या खर्चाच्या प्रचंड तरतुदींमुळे पाकिस्तानातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
पाकिस्तानच्या २०२५च्या केंद्रीय अर्थसंकल्पावर संपूर्ण देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सामान्य जनतेसाठी फारसा दिलासा नसतानाही, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासाठी करण्यात आलेल्या खर्चाच्या प्रचंड तरतुदींमुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेषतः पंतप्रधानांच्या खानसाम्याच्या अर्थात शेफच्या पगाराने चर्चेला उधाण आले आहे.
शाहबाज यांच्या स्वयंपाकासाठी ११ कोटींची तरतूद
जिओ न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, शाहबाज शरीफ यांच्या खानसाम्याच्या पगारासाठी अर्थसंकल्पात दरवर्षी ११ कोटी पाकिस्तानी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याचा अर्थ या शेफला दरमहा सुमारे ९० लाख रुपये पगार म्हणून दिले जातील. विशेष म्हणजे, यापूर्वी याच पदासाठी दरवर्षी ३ कोटी रुपये राखीव होते, म्हणजेच नव्या बजेटमध्ये या खर्चात तिपटीने वाढ झाली आहे.
बागेच्या देखभालीसाठी ४.४८ कोटी रुपये!
पंतप्रधान निवासातील बागेची देखभाल करण्यासाठी तब्बल ४ कोटी ४८ लाख रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये माळींचे वेतन, फुलझाडांची खरेदी यांचा समावेश आहे. हाच खर्च महिन्याच्या हिशोबाने पाहिला तर, ३५ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.
सुरक्षेसाठीही मोठी तरतूद
शाहबाज शरीफ यांच्या सुरक्षेसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ८६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही रक्कम मागील वर्षाच्या तुलनेत १४ कोटींनी अधिक आहे. त्यांच्या वाहनांच्या ताफ्यासाठीही ९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, यामुळे नवीन गाड्यांची खरेदी होऊ शकते.
दवाखाना आणि पगारासाठी स्वतंत्र निधी
पंतप्रधान निवासातील प्राथमिक दवाखान्यासाठी १.५ कोटी रुपये, तर निवासस्थानी काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
सामान्य नागरिकांसाठी काय?
या साऱ्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर, इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (PTI) या पक्षाने अर्थसंकल्पाचा तीव्र निषेध करत देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. यंदाचा हा संपूर्ण अर्थसंकल्प आयएमएफच्या सूचनांनुसार तयार करण्यात आला असून, यात सामान्य शेतकरी, मजूर आणि मध्यमवर्गीयांसाठी कोणतीही ठोस मदत नाही, असे विरोधी पक्षाने म्हटले.
हा जनतेचा विश्वासघात आहे!
इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफने म्हटले की, कर वाढवून सरकारने फक्त जनतेवर आर्थिक भार वाढवला असून, पंतप्रधानांसाठी होत असलेल्या खर्चामुळे हा अर्थसंकल्प जनतेचा विश्वासघात करणारा आहे.