मालेगाव मनपाच्या ८३ जागांसाठी ३०१ उमेदवार निवडणूक रिंगणात, इस्लाम पक्षाचा एक उमेदवार बिनविरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 14:58 IST2026-01-03T14:57:59+5:302026-01-03T14:58:55+5:30
आजपासून धडाडणार प्रचाराच्या तोफा

मालेगाव मनपाच्या ८३ जागांसाठी ३०१ उमेदवार निवडणूक रिंगणात, इस्लाम पक्षाचा एक उमेदवार बिनविरोध
मालेगाव : महापालिकेच्या २१ प्रभागांमधून ८४ नगरसेवक निवडले जाणार आहेत. अर्ज माघारीच्या दिवशी प्रभाग ६ मधून इस्लाम पार्टीच्या मुनिरा शेख फकीर मुहंमद या बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. आता ८३ जागांसाठी ३०१ उमेदवार रिंगणात असून, त्यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. येथे सर्वच प्रमुख पक्ष वेगवेगळे लढत असले तरी कोणत्याही पक्षाला सर्व जागांवर उमेदवार देता आलेले नाहीत. शुक्रवारी (दि. २) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अंतिम दिवस होता. ऐन मोक्याच्या क्षणी काही उमेदवारांनी माघार घेतल्याने काही पक्षांना दिलासा मिळाला आहे.
मालेगाव महापालिकेच्या २१ प्रभागांमधून ८४ नगरसेवक निवडायचे असून, ही निवडणूक पूर्व व पश्चिम अशा दोन भागांत लढवली जात आहे. पूर्व भागात १६, तर पश्चिम भागात ५ प्रभागांचा समावेश आहे. उमेदवारी अर्जाच्या छाननीनंतर एकूण ५२६ अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी २२५ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात ३०१ उमेदवार शिल्लक राहिले आहेत.
कोण कोण रिंगणात ?
शहरात भाजप, शिंदेसेना, उद्धवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट, काँग्रेस, समाजवादी पार्टी, एमआयएम तसेच स्थानिक इस्लाम पार्टीने उमेदवार उभे केले आहेत. मालेगावात महायुती व महाविकास आघाडीतील पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत.
शिंदेसेनेतील नाराजांची भुसे यांनी घेतली भेट
शिंदेसेनेचे प्रकाश भडांगे यांना एबी फॉर्म नाकारल्याने त्यांनी ठिय्या आंदोलन करत अपक्ष अर्ज दाखल केला होता. मंत्री दादा भुसे यांनी त्यांची भेट घेऊन समजूत काढल्यानंतर भडांगे यांनी अर्ज मागे घेतला. त्यांनी माघार घेतली असली तरी दिलेल्या आश्वासनांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
प्रभाग १ मधून सर्वाधिक माघारी
अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी २१ प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक १ मधून सर्वाधिक उमेदवारांनी माघार घेतली आहे. या प्रभागातून तब्बल ३३ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज मागे घेतले. यापाठोपाठ प्रभाग क्रमांक १० मधून २४ उमेदवारांनी, तर प्रभाग क्रमांक ९ मधून १९ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत. या माघारीमुळे संबंधित प्रभागांतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, काही ठिकाणी थेट लढतीचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे.
आज अपक्षांना चिन्हवाटप
शनिवारी (दि. ३) अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार असून, अपक्ष व अमान्यताप्राप्त (नोंदणीकृत) राजकीय पक्षांच्या उमेदवारांना १९४ मुक्त चिन्हांमधून चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. सकाळी ११ नंतर चिन्ह निश्चितीची प्रक्रिया होणार आहे.
प्रभाग १० मध्ये भाजपला मतविभाजनाचा धोका
प्रभाग क्रमांक १० ब मधून भाजपचे नितीन पोफळे यांना एबी फॉर्म नाकारल्याने त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घ्यावा यासाठी मोठे प्रयत्न होऊनही त्यांनी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे आता या जागेवर त्यांची लढत भाजपच्या अधिकृत उमेदवाराबरोबर होणार आहे. त्यामुळे संबंधित जागेवर भाजपला मतविभाजनाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पक्षनिहाय उमेदवार
एमआयएम - ६०
इस्लाम पार्टी - ४७
शिंदेसेना - २४
भाजप - २०
काँग्रेस - १९
राष्ट्रवादी (शरद पवार) - ११
राष्ट्रवादी (अजित पवार) - १०