हिंगोलीत शिंदेसेनेने भाजपचे २ उमेदवार फोडले; आरोप-प्रत्यारोपानंतर निवडणूकीत धक्कातंत्र
By प्रसाद आर्वीकर | Updated: November 22, 2025 13:04 IST2025-11-22T13:03:38+5:302025-11-22T13:04:29+5:30
शिंदेसेनेने भाजपचे दोन उमेदवार फोडून वापरलेल्या धक्कातंत्राने हिंगोली येथील निवडणूक चांगलीच चर्चेत येत आहे.

हिंगोलीत शिंदेसेनेने भाजपचे २ उमेदवार फोडले; आरोप-प्रत्यारोपानंतर निवडणूकीत धक्कातंत्र
हिंगोली : राज्यात सत्तेत असलेले भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे तिन्ही पक्ष जिल्ह्यात नगरपालिकेच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. आतापर्यंत एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपांनी निवडणुकीत रंगत भरली होती. मात्र शिंदेसेनेने भाजपचे दोन उमेदवार फोडून वापरलेल्या धक्कातंत्राने हिंगोली येथील निवडणूक चांगलीच चर्चेत येत आहे.
जिल्ह्यात ३ पालिकांच्या निवडणुका होत आहेत. सुरुवातीच्या काळात महायुती की स्वतंत्र निवडणूक लढवायची याबाबत संभ्रम होता. मात्र तिन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात आहेत. त्यामुळे सत्तेतील पक्षांमध्येच आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगत आहे.
हिंगोलीच्या नगराध्यक्षपदाच्या जागेवर भाजपचा दावा सांगितला जात असताना आमदार संतोष बांगर यांनी येथील निवडणुकीत उडी घेऊन शिंदेसेनेच्या वतीने नगराध्यक्षासह नगरसेवकपदासाठी उमेदवार उभे केले. त्यामुळे भाजप आणि शिंदेसेनेत सुरुवातीपासूनच वादाची ठिणगी पडली. त्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानेही नगराध्यक्षासह नगरसेवकपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
या निवडणुकीच्या निमित्ताने आमदार संतोष बांगर आणि आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्यात अनेक वेळा आरोप-प्रत्यारोप झाले. हिंगोलीत युती होईल, अशी भाजपला शेवटच्या क्षणापर्यंत आशा होती. मात्र आतापर्यंत तरी तशा कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. उलट भाजपचे उमेदवार फोडून त्यांना शिंदेसेनेत प्रवेश देण्याचे धक्कातंत्र आमदार संतोष बांगर यांनी अवलंबले आहे. असे दोन धक्के भाजपला सहन करावे लागले. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपानंतर आता धक्कातंत्राने येथील निवडणूक चर्चेत येत आहे.
शिंदेसेनेतून भाजपात; पण उमेदवारी नाकारली
वसमतमध्ये नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळावी, यासाठी ऐनवेळी शिंदेसेनेतून डॉ. एम. आर. क्यातमवार हे भाजपमध्ये दाखल झाले. त्यांच्या पत्नी सविता मारोती क्यातमवार यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र भाजप पक्षश्रेष्ठींनी भाजपतर्फे माजी नगराध्यक्ष शिवदास बोड्डेवार यांच्या पत्नी सुषमा शिवदास बोड्डेवार यांना भाजपची उमेदवारी जाहीर केली.
अखेरच्या दिवशी ८२ अर्ज माघारी
नामनिर्देशनपत्र माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी तिन्ही नगरपालिकांतून ८२ जणांनी माघार घेतली आहे. त्यात नगराध्यक्षपदाच्या ८ आणि नगरसेवकपदाच्या ७४ उमेदवारांचा समावेश आहे.