मतदानाच्या पूर्वसंध्येला हिंगोलीत १ कोटींची रक्कम पकडली; व्यापारी पुढे आला, पुढे काय घडले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 19:23 IST2025-12-02T19:22:05+5:302025-12-02T19:23:17+5:30
१ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास पोलिसांची गस्त सुरू असताना एका वाहनात रक्कम असल्याची माहिती मिळाली.

मतदानाच्या पूर्वसंध्येला हिंगोलीत १ कोटींची रक्कम पकडली; व्यापारी पुढे आला, पुढे काय घडले?
हिंगोली : शहरातील शेतकरी भवन परिसरात १ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पोलिस आणि निवडणूक विभागाच्या पथकाने एका चारचाकी वाहनातून १ कोटी रुपयांची रोकड जप्त केली. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात या रकमेचा पंचनामा करण्यात आला. पडताळणीअंती या रकमेची रीतसर परवानगी असल्याने ती व्यापाऱ्याला परत करण्यात आली.
१ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास पोलिसांची गस्त सुरू असताना एका वाहनात रक्कम असल्याची माहिती मिळाली. माहितीनंतर पोलिस कर्मचारी आणि निवडणूक विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शेतकरी भवन परिसरात एम.एच.३८/ए.डी. ६५०२ या क्रमांकाच्या वाहनाची तपासणी केली असता त्यात रोकड आढळली. त्यानंतर चालक आणि अन्य एका व्यक्तीकडे या रकमेविषयी विचारणा केली असता, मे. नारायणा ट्रेडर्स गजानन कृषी बाजार, उमरा, ता. कळमनुरी यांची ही रक्कम असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे निवडणूक विभागाच्या आचारसंहिता पथकाचे नोडल अधिकारी तथा गटविकास अधिकारी व्ही. एस. भोजे यांचे रकमेसंदर्भातील परवानगीचे पत्र दाखविले. शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदी करण्यासाठी नगदी स्वरूपात रक्कम अदा करण्यासाठी बँकेतून नगदी स्वरूपात रक्कम काढणे व स्थलांतरित करण्यासाठीची ही परवानगी दिल्याचे हे पत्र पथकातील कर्मचाऱ्यांना दाखविले. त्यानंतर पथकातील कर्मचाऱ्यांनी चारचाकी वाहन आणि रक्कम निवडणूक विभागात आणली. या ठिकाणी रकमेची पडताळणी करण्यात आली.
पडताळणीअंती व्यापाऱ्याच्या ताब्यात दिली
पोलिस विभागाकडून पकडलेल्या १ कोटी रुपयांच्या रक्कमेची पडताळणी केली. ही रक्कम हेडा नामक व्यापाऱ्याची असून, त्यांना या कार्यालयामार्फत एक कोटी रुपये बँकेतून काढून त्याची वाहतूक करण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार रक्कम एक कोटी रुपयांची आहे का, याची पडताळणी केली असता ती तेवढीच भरून आल्याने रक्कम व्यापाऱ्याच्या ताब्यात दिली आहे.
-समाधान घुटूकडे, निवडणूक निर्णय अधिकारी