Maharashtra Election 2019 : हिंगोली जिल्ह्यात वसमत, कळमनुरीत बंडखोरीचे पीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 15:31 IST2019-10-05T14:49:50+5:302019-10-05T15:31:18+5:30
बंडखोरीचे पीक आल्याने तिरंगी, चौरंगी लढती होण्याची चिन्हे

Maharashtra Election 2019 : हिंगोली जिल्ह्यात वसमत, कळमनुरीत बंडखोरीचे पीक
- विजय पाटील
हिंगोली : जिल्ह्यात वसमत व कळमनुरीत बंडखोरीचे पीक आल्याने तिरंगी, चौरंगी लढती होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
कळमनुरी मतदारसंघात शिवसेनेचे संतोष बांगर व काँग्रेसचे संतोष टारफे या दोन प्रमुख उमेदवारांत अटीतटीचा सामना रंगणार आहे. त्यात वंचितकडून अजित मगर यांना उमेदवारी मिळाल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.
या मतदारसंघात अजूनही काँग्रेसची बरीचशी मंडळी सक्रियच नाही. खा.राजीव सातव यांनीही उमेदवारी जाहीर केल्यानंतर फारसे लक्ष घातले नाही. अर्ज भरण्यासाठी ते हिंगोलीत फिरकले नाहीत. कळमनुरीत मात्र त्यांनी नावालाच हजेरी लावली. त्याचाही परिणाम म्हणून इतर मंडळी संभ्रमात दिसत आहे.
भाजपचे अॅड. शिवाजी माने व गजानन घुगे यांनी बंडखोरीची भाषा चालविली आहे. मात्र सेनेकडून मनधरणीही जोरात सुरू आहे. त्यात अपयश आले तर लढत चौरंगी होण्याची शक्यता आहे.वसमतमध्येही शिवसेनेचे आ.जयप्रकाश मुंदडा व राष्ट्रवादीचे राजू नवघरे यांच्यातच लढतीची अपेक्षा
होती.भाजपचे बंडखोर अॅड.शिवाजी जाधव यांची एन्ट्री शिवसेनेची तर वंचितचे मुनीर पटेल हे राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढवणारी आहे.
हिंगोलीत सर्वात कमी अर्ज : हिंगोलीत भाजपचे आ. तान्हाजी मुटकुळे, काँग्रेसचे भाऊराव पाटील गोरेगावकर, वंचितचे वसीम देशमुख यांच्यात सामना रंगण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात सर्वात कमी १७ जणांचे अर्ज या मतदारसंघातच आले आहेत. येथेही काँग्रेसच्या गट-तटाच्या भिंती कायम आहेत. शिवसेनेतर्फे रामेश्वर शिंदे यांनी उमेदवारी दाखल केली आहे.