मनोरूग्णाने घातला 14 वर्षीय मुलाच्या डोक्यात दगड, मुलाला गंभीर अवस्थेत नांदेडला हलविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2023 22:01 IST2023-05-14T22:00:00+5:302023-05-14T22:01:46+5:30
ही घटना वसमत शहरातील शहर पोलिस ठाण्याजवळ १४ मे रोजी दुपारी ४:१७ वाजता घडली.

मनोरूग्णाने घातला 14 वर्षीय मुलाच्या डोक्यात दगड, मुलाला गंभीर अवस्थेत नांदेडला हलविले
रमेश वाबळे
हिंगोली : रस्त्याने जात असताना पाठिमागून येवून अचानक मनोरूग्णाने एका बारा वर्षीय मुलाच्या डोक्यात दगड मारला. ही घटना वसमत शहरातील शहर पोलिस ठाण्याजवळ १४ मे रोजी दुपारी ४:१७ वाजता घडली.
दुपारी ४ वाजेदरम्यान प्रणव विश्वनाथ मगर (वय १२, रा. बॅंक काॅलनी, वसमत) हा शहर पोलिस ठाण्याजवळील जि.प.मैदानाच्या बाजूच्या रस्त्याने जात होता. दरम्यान, एक मनोरूग्ण या मुलाच्या पाठिमागून धावत आला व अचानक डोक्यात दगड मारून आलेल्याच दिशेने परत पळाला. दगडाचा जोराने मार लागल्याने प्रणव मगर हा जागेवरच कोसळला.
वसमत: मनोरूग्णाने घातला मुलाच्या डोक्यात दगड pic.twitter.com/7s2X5CjTTm
— Lokmat (@lokmat) May 14, 2023
ही घटना लक्षात आल्यानंतर आजुबाजूंच्या नागरिकांनी प्रणवला तात्काळ वसमत येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. परंतु, गंभीर मार असल्याने डाॅक्टरांनी प्रथमोपचार करून नांदेडला हलविण्याचा सल्ला दिला. प्रणव याच्यावर नांदेड येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
पोलिस घेताहेत मनोरूग्णाचा शोध...
दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली. पोलिसांनी सिसीटीव्हीचा व्हायरल झालेल्या व्हिडीओचा आधार घेत त्या मनोरूग्णाचा शोध घेणे सुरू केले आहे. परंतु, १४ मे रोजी रात्री ९:३० वाजेपर्यंत तरी मनोरूग्णाचा शोध पोलिसांना लागला नव्हता.