Maharashtra Election 2019 ; What did the BJP government do for the common man? | Maharashtra Election 2019 ; सर्वसामान्यांसाठी भाजप सरकारने काय केले ?

Maharashtra Election 2019 ; सर्वसामान्यांसाठी भाजप सरकारने काय केले ?

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : प्रचार सभेत घणाघाती टीका

लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : सत्तेवर आल्यास सर्वसामान्य जनतेचे कल्याण करु असे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने मागील पाच वर्षांत सर्वसामान्य नागरिकांच्या परिस्थितीत कोणता बदल हेच कळायला मार्ग नाही. भाजपने जी आश्वासने दिली होती त्याच्या नेमके विरोधी चित्र देश आणि राज्यात आहे. भाजप सरकार विकास कामात नव्हे तर मोठ्या घोषणा करण्यातच देश आणि राज्यात पुढे असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा.प्रफुल्ल पटेल यांनी केली.
अर्जुनी मोरगाव मतदारसंघाचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या निवडणूक प्रचारार्थ तालुक्यातील डव्वा येथे आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते.
या वेळी प्रामुख्याने उमेदवार मनोहर चंद्रिकापुरे, गंगाधर परशुरामकर, ईश्वर बाळबुध्दे, हिरालाल चव्हाण, मधुसूदन दोनोडे, डॉ.अविनाश काशीवार, नरेश भेंडारकर, देवचंद तरोणे, किशोर सहारे, रमेश चुऱ्हे, छाया चव्हाण, सरिता कापगते, प्रभाकर दोनोडे, हेमलता भांडारकर, पुष्पमाला बडोले, निशांत राऊत, गजानन परशुरामकर, रजनी गिऱ्हेपुंजे, दिलीप कापगते, डॉ. रुखीराम वाढई, रुपविलास कुरसुंगे, लक्ष्मण लंजे, उमराव मांढरे उपस्थित होते. प्रफुल्ल पटेल म्हणाले, भाजप सरकारच्या धोरणामुळे शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य जनता देखील त्रस्त आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. या सरकारने केवळ योजनांची नावे बदलविली नाही तर अनेक लोक कल्याणकारी योजना सुध्दा बंद केल्या.
एकीकडे विकासाचे स्वप्न दाखवून दुसरीकडे त्या विरोधी धोरणे तयार करुन स्वप्न भंग करण्याचे काम भाजप सरकारने केले. या क्षेत्राचे आमदार आणि पालकमंत्र्यांनी मागील पाच वर्षांत एकही असे विकास काम केले नाही की ज्यामुळे सर्वसामान्य जनतेचे हित साधले गेले. त्यामुळे अशा आश्वासनांची खैरात वाटणाऱ्या सरकारला धडा शिकविण्याची संधी मतदारांना मिळाली असून त्याचा पुरेपूर फायदा घेऊन त्यांना त्यांची जागा दाखवून द्या असे प्रफुल्ल पटेल म्हणाले. या वेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी या वेळी मार्गदर्शन केले.

Web Title: Maharashtra Election 2019 ; What did the BJP government do for the common man?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.