Maharashtra Election 2019 ; अर्जुनी मोरगावात दुहेरी लढतीची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 06:00 IST2019-10-04T06:00:00+5:302019-10-04T06:00:21+5:30
अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव तालुके तसेच गोरेगाव तालुक्याचा मोहाडी महसूल मंडळाचा समावेश आहे. क्षेत्रात २९५ गावे असून या निवडणूकीसाठी ३१६ मतदान केंद्र आहेत. अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी तालुक्यातील काही गावे नक्षलग्रस्त आहेत. मतदारसंघात १२३६ दिव्यांग मतदार आहेत.

Maharashtra Election 2019 ; अर्जुनी मोरगावात दुहेरी लढतीची शक्यता
संतोष बुकावन।
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : २००८ च्या परिसीमनमध्ये अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. हा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गाच्या उमेदवारासाठी राखीव आहे. २००९ व २०१४ या दोन्ही निवडणुकांत भाजपचे राजकुमार बडोले विजयी झाले आहेत. पक्षाने तिसऱ्यांदा त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला. आता हॅट्रिकची संधी त्यांना उपलब्ध झाली आहे. ते हॅट्रिक साधतील काय? याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.
अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव तालुके तसेच गोरेगाव तालुक्याचा मोहाडी महसूल मंडळाचा समावेश आहे. क्षेत्रात २९५ गावे असून या निवडणूकीसाठी ३१६ मतदान केंद्र आहेत. अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी तालुक्यातील काही गावे नक्षलग्रस्त आहेत. मतदारसंघात १२३६ दिव्यांग मतदार आहेत. सखी मतदान केंद्र म्हणून १३१ सडक अर्जुनी व २५१ अर्जुनी मोरगाव हे असणार आहेत. या केंद्रांवर महिला मतदारांचे प्रमाण अधिक असणार आहे. विशेष म्हणजे या केंद्रावर निवडणूक कार्यासाठी सर्व महिला कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत.
२५१ अर्जुनी मोरगाव हे मॉडेल मतदान केंद्र राहणार असून या केंद्रावर ६९७ पुरु ष व ६७६ महिला असे एकूण १३७३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने प्रशासन कामाला लागले आहे. या मतदारसंघात ही तिसरी विधानसभा निवडणूक आहे. दोनदा राजकुमार बडोले या जागेवरून निवडून आले. २०१४ च्या निवडणुकीत युती व आघाडी पक्षात युती होऊ शकली नाही.भाजप, सेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे उमेदवार स्वतंत्र लढले. यात बडोलेंनी बाजी मारली.२००९ च्या विधानसभेत आघाडीची जागा काँग्रेसच्या वाट्याला होती.
यावेळी ही जागा कॉंग्रेसच्या वाट्याला यावी यासाठी आघाडीच्या पक्षश्रेष्ठींमध्ये बरीच खलबते चालली. अखेर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली. राष्ट्रवादीची उमेदवारी मनोहर चंद्रिकापुरे यांना मिळाली आहे. राजकीय पक्षांचे उमेदवार कोण असतील या चर्चांना आता पूर्णविराम मिळाले आहे. चित्र जवळपास स्पष्ट झाले असून दुहेरी लढतीची शक्यता आहे. प्रफुल्ल पटेल व नाना पटोले यांच्यासमोर आघाडीची ही जागा निवडून आणण्याचे मोठे आव्हान असेल.
२०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या काळात १३७१५ मतदारांची वाढ झाली आहे.
२००९ मध्ये उमेदवार निहाय मिळालेले मतदान
राजकुमार बडोले भाजप ६९८५६
रामलाल राऊत भाराकॉ ५३५४९
किरण कांबळे अपक्ष १०४२८
राजकुमार बडोले १६३०७ मतांनी विजयी
२०१४ मध्ये उमेदवार निहाय मिळालेले मतदान
राजकुमार बडोले भाजप ६४४००१
राजेश नंदागवळी भाराकॉ ३४१०६
मनोहर चंद्रिकापुरे रा कॉ ३१८९३
राजकुमार बडोले ३०२९५ मतांनी विजयी
उमेदवारी न मिळाल्याने होणार हिरमोड
विविध राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी या मतदारसंघात दिसून येते.आघाडीपैकी राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे यांची जोरदार तयारी सुरू असली तरी काँग्रेसकडून आनंदकुमार जांभुळकर, राजेश नंदागवळी, माणिक घनाडे, रत्नदीप दहिवले हे इच्छुक आहेत. युतीच्या जागेचा पेच सुटला.आघाडीचा गुंता कायम आहे. त्यामुळे उमेदवारी न मिळणार नसलेल्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.