Maharashtra Election 2019 ; विधानसभेच्या निवडणुकीसाठी चोख बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 06:00 IST2019-10-20T06:00:00+5:302019-10-20T06:00:23+5:30
दोन दिवसापूर्वी गोंदिया जिल्हा पोलिसांनी घातपात करण्यासाठी देवरीच्या डोंगरगाव येथील एका इसमाच्या घरून २१ डिटोनेटर पोलिसांनी जप्त करीत आरोपीला अटक केले. दुसऱ्या दिवशी सालेकसा तालुक्याच्या मगरडोह येथे नक्षलवाद्यांनी एका इसमाची हत्या केल्यामुळे पोलीस बंदोबस्त चोख नेमण्यात आला.

Maharashtra Election 2019 ; विधानसभेच्या निवडणुकीसाठी चोख बंदोबस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक शांततेत पार पडावी,यासाठी गोंदिया जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. मतदान प्रक्रिया तोंडावर असतांना नक्षलवाद्यांनी सालेकसा तालुक्यातील मगरडोह येथे एका इसमाची हत्या केल्यामुळे आणखीनच बंदोबस्तात भर टाकावी लागली. गोंदिया जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात कंपन्या मागविण्यात आल्या आहेत.
गोंदिया जिल्ह्याच्या चारही विधानसभा क्षेत्रात चोख बंदोबस्त नेमण्यात आला.गोंदिया जिल्ह्यात एक पोलीस अधीक्षक, एक अतिरिक्त पोलीस अधीक्षक, सहा उपविभागीय पोलीस अधिकारी,२१ पोलीस निरीक्षक, १५५ सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक, २००९ पोलीस कर्मचारी, ६५६ गृहरक्षक दलाचे जवान, १३ बीएसएफ कंपन्या, ३ बीडीडीएस कंपन्या, विशेष अभियान पथकाच्या १५ पार्ट्या, क्युआरटीची १ पार्टी व नक्षलग्रस्त भागात घातपाताच्या घटना घडू नयेत यासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला आहे. दोन दिवसापूर्वी गोंदिया जिल्हा पोलिसांनी घातपात करण्यासाठी देवरीच्या डोंगरगाव येथील एका इसमाच्या घरून २१ डिटोनेटर पोलिसांनी जप्त करीत आरोपीला अटक केले. दुसऱ्या दिवशी सालेकसा तालुक्याच्या मगरडोह येथे नक्षलवाद्यांनी एका इसमाची हत्या केल्यामुळे पोलीस बंदोबस्त चोख नेमण्यात आला. निवडणुकीच्या काळात प्रत्येक कर्मचाऱ्याची करडी नजर राहणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील जनतेने निर्भयतेने मतदान करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. आपल्या मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीला बळकट करण्यासाठी शांततेत स्वयंस्फूर्तीने मतदान करावे असे आवाहन पोलीस विभागातर्फे करण्यात आले आहे. नेमण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्तासाठी आज (दि.१९) रोजी रवाना करण्यात आले. आजपासूनच जिल्हाभरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
नक्षलग्रस्त भागात ३ वाजेपर्यंत मतदान
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव व अर्जुनी-मोरगाव या दोन विधानसभा क्षेत्रात सकाळी ७ ते दुपारी ३ वाजता पर्यंत मतदान होणार आहे. लोकशाहीला बळकट करण्यासाठी नक्षलग्रस्त भागातील जनतेनेही निर्भतेने मतदान करावे, मतदान पेट्या सुरक्षित स्थळी पोहचाव्यात यासाठी दुपारी ३ वाजतापर्यंतच मतदानाची वेळ ठेवण्यात आली आहे.