Maharashtra Election 2019 ; सर्वच पक्षांना महिला उमेदवारांची अॅलर्जी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 06:00 IST2019-10-10T06:00:00+5:302019-10-10T06:00:20+5:30
महिलांनी आपल्या कार्य कर्तृत्वाच्या बळावर सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमठविला आहे. राजकारणात सुध्दा महिला सक्रीय असून त्यांनी आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, परराष्ट्र मंत्री पदापासून अनेक महत्त्वपूर्ण पदांची जवाबदारी महिलांना सक्षमपणे पार पाडली आहे.

Maharashtra Election 2019 ; सर्वच पक्षांना महिला उमेदवारांची अॅलर्जी
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महिलांना राजकारणासह सर्वच क्षेत्रात ३३ टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. तसेच सर्वच राजकीय पक्षांकडून महिलांना समान संधी देण्याची भाषा केली जाते. मात्र प्रत्यक्षात करनी आणि कथनीत बरेच फरक असल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील चारही मतदारसंघातून एकूण ४७ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र यात एकाही राजकीय पक्षाने महिला उमेदवाराला संधी दिलेली नाही. आमगाव मतदारसंघातून केवळ एक अपक्ष महिला उमेदवार रिंगणात आहे.त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना महिला उमेदवारांची अॅलर्जी असल्याचे चित्र आहे.
महिलांनी आपल्या कार्य कर्तृत्वाच्या बळावर सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमठविला आहे. राजकारणात सुध्दा महिला सक्रीय असून त्यांनी आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, परराष्ट्र मंत्री पदापासून अनेक महत्त्वपूर्ण पदांची जवाबदारी महिलांना सक्षमपणे पार पाडली आहे.
शिवाय त्यांना मिळालेल्या संधीचे सोने करीत त्यांनी वेगळी छाप पाडली आहे. तर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याची भाषा केली जाते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, आमगाव, गोंदिया आणि तिरोडा मतदारसंघातून एकूण ४७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
मात्र भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी या प्रमुख राजकीय पक्षांनी महिला उमेदवाराला संधी दिलेली नाही. त्यामुळे ४७ उमेदवारांमध्ये केवळ एकमेव महिला उमेदवाराचा समावेश आहे.
आमगाव विधानसभा क्षेत्रातून उर्मिला टेकाम अपक्ष म्हणून रिंगणात आहे.त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या करनी आणि कथनीत बरेच अंतर असल्याचे चित्र आहे.
महिलांमध्ये नाराजीचा सूर
विधानसभा निवडणुकीत एकूण १० लाख ९६ हजार ४४१ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. यात सर्वाधिक ५ लाख ५१ हजार ८२० महिला मतदारांचा समावेश आहे. तर पुरुष मतदारांची संख्या ही ५ लाख ४४ हजार ६१९ ऐवढी आहे.महिला मतदारांची संख्या अधिक असून राजकीय पक्षांनी एकाही महिला उमेदवाराला संधी न दिल्याने महिला मतदारांमध्ये नाराजीचा सूर आहे.
इच्छूक महिला उमेदवारांचा हिरमोढ
२०१४ विधानसभा निवडणुकीत काही राजकीय पक्षांनी महिला उमेदवारांना संधी दिली होती. तर या निवडणुकीत आमगाव, तिरोडा, अर्जुनी मोरगाव या विधानसभा मतदारसंघातून प्रमुख पक्षाच्या इच्छुक महिला उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारी मागीतली होती. मात्र एकाही पक्षाने त्यांना संधी न दिल्याने त्यांचा हिरमोढ झाला.
महिलांची भूमिका ठरणार निर्णायक
जिल्ह्यातील चारही मतदारसंघाचा विचार केल्यास सर्वच मतदारसंघात महिला मतदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सर्वच पक्षाच्या उमेदवारांचे लक्ष महिला मतदारांवर राहणार आहे.या निवडणुकीत महिला मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.