Maharashtra Election 2019 : 47 Candidates' fate EVMband | Maharashtra Election 2019 : ४७ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएमबंद

Maharashtra Election 2019 : ४७ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएमबंद

ठळक मुद्देजिल्ह्यात सरासरी ७० टक्के मतदान : अर्जुनी मोरगाव ६९ ते ७० टक्के , तिरोडा ६८ ते ७० टक्के, गोंदिया ६४ ते ६६ टक्के आणि आमगाव ६६ ते ६८ टक्के सरासरी मतदान, मतदान प्रक्रिया शांततेत

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील गोंदिया, आमगाव, अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा या चारही मतदारसंघात सोमवारी (दि.२१) मतदान घेण्यात आले. यात जिल्ह्यातील एकूण १० लाख ९८ हजार २७० मतदारांपैकी ७० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.
चारही मतदारसंघातील दोन तीन ठिकाणी ईव्हीएम मशिनमध्ये बिघाडाच्या घटना वगळता जिल्ह्यात शांततेत मतदान पार पाडले.अर्जुनी मोरगाव आणि आमगाव या नक्षलग्रस्त भागात सुध्दा ६८ टक्के मतदान झाले. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एकूण ४७ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएमबध्द झाले असून चारही मतदारसंघाचे आमदार कोण याचा फैसला गुरुवारी (दि.२४) रोजी होणार आहे.
२१ सप्टेबरला निवडणूक आचारसंहित लागू झाल्यापासून निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली. ७ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर जिल्ह्यातील चारही मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले.त्यामुळे मागील पंधरा दिवस जिल्ह्यातील राजकीय रणागंण चांगले तापले होते. गेली पंधरा दिवस उमेदवार आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचा सोमवारी मतदान हा महत्त्वाचा दिवस होता. लोकशाहीच्या मतोत्सवात जिल्ह्यातील मतदार सुध्दा उत्साहात सहभागी होऊन मतदानाचे कर्तव्य बजाविले.गोंदिया आणि तिरोडा मतदारसंघात सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. अर्जुनी मोरगाव आणि आमगाव या नक्षलग्रस्त मतदारसंघात सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. मतदानासाठी प्रशासनाने सुट्टी जाहीर केली होती. त्यामुळे सकाळपासूनच सर्वच मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांची गर्दी झाली होती. सकाळी ९ वाजेपर्यंत चारही मतदारसंघात ९.०६ टक्के, ९ ते ११ वाजेपर्यंत २३.७० टक्के आणि ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत ४०.३३ टक्के मतदान झाले होते. तर नक्षलग्रस्त भागात मतदारांपर्यंत मतदानासाठी उत्साह दिसून आला. महिला मतदारांनी मतदान करण्यासाठी सकाळपासूनच अनेक मतदान केंद्रावर गर्दी केली. निवडणूक विभागाने दिव्यांगासाठी सर्वच मतदान केंद्रावर व्हील चेअरची व्यवस्था केली होती. तर कर्मचारी सुध्दा दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत पोहचविण्यासाठी मदत करीत होते. उमेदवारांसह नेत्यांनी सुध्दा कुटुंबीयांसह मतदान केंद्रावर पोहचत मतदानाचा हक्क बजावून मतदारांचा उत्साह वाढवून लोकशाहीच्या महोत्सवात सहभागी होण्यास सांगितले. गोंदिया येथील नमाद महाविद्यालयातील मतदान केंद्रावर खा.प्रफुल्ल पटेल यांनी पत्नी वर्षा पटेल यांच्यासह मतदानाचा हक्क बजाविला. तर निवडणूक रिंगणात असलेले भाजप-सेना युतीचे उमेदवार गोपालदास अग्रवाल,राजकुमार बडोले, विजय रहांगडाले, संजय पुराम तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मनोहर चंद्रिकापुरे, गुड्डू बोपचे व अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल यांनी सुध्दा मतदान केंद्रावर सकाळीच पोहचत मतदानाचा हक्क बजाविला. दुपारी ३ वाजताच्या सुमारास गोंदिया येथे पावसाला सुरूवात झाली होती. त्यामुळे याचा मतदानाला फटका बसण्याची शक्यता होती.लवकरच पाऊस थांबल्याने याचा परिणाम झाला नाही. काही मतदान केंद्रावर सांयकाळी ६ वाजतानंतर गर्दी वाढल्याने उशीरापर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे मतदानाची आकडेवारी जाहीर होण्यास विलंब झाला होता. त्यामुळेच सरासरी ७० टक्के मतदानाचा अंदाज वर्तविला.

तीन ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड
सोमवारी मतदान प्रक्रियेदरम्यान गोरेगाव तालुक्यातील पिंडकेपार येथील मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड आल्याने काही वेळ मतदानाची प्रक्रिया ठप्प होती. मात्र लगेच दुसरी मशिन उपलब्ध करुन देण्यात मतदान पुन्हा सुरळीत सुरू झाले. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येरंडी येथील ईव्हीएममध्ये बिघाड आल्याने लगेच दुसरी मशिन लावून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली. तर याच तालुक्यातील खांबी येथील मतदान केंद्र क्रमांक २२२ मधील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड आला होता त्यामुळे १५ ते २० मिनीटे मतदान ठप्प झाले होत. दुसरी ईव्हीएम लावून मतदान सुरळीत सुरू झाले.

महिला मतदारांमध्ये उत्साह
जिल्ह्यातील चारही मतदारसंघात सर्वाधिक महिला मतदारांची ५ लाख ५२ हजार ८६२ संख्या आहे. तर सोमवारी मतदान प्रक्रियेदरम्यान नक्षलग्रस्त भागातील महिला मतदारांनी पुढे होऊन आपला मतदानाचा हक्क बजाविला. काही मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी महिलांच्या मोठी रांग लागली होती. त्यामुळे महिला मतदारांमध्ये उत्साह दिसून आला आहे.

नक्षलग्रस्त भागातील मतदारांनी निडरपणे केले मतदान
अर्जुनी मोरगाव आणि आमगाव मतदारसंघ हे नक्षलप्रभावीत आहे. या मतदारसंघातील काही गावे दुर्गम भागात आहे. तर काही दिवसांपूर्वीच काही गावातील नागरिकांना मतदान न करण्याचे आवाहन नक्षल्यांनी केले होते. मात्र पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त लावून आणि मतदारांमध्ये आत्मविश्वास निर्माण केल्याने या भागातील मतदारांनी मतदानासाठी निडरपणे घराबाहेर पडता मतदानाचा हक्क बजाविला.

मतदान केंद्रांची आकर्षक सजावट
निवडणूक विभागाने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सखी मतदान केंद्राची संकल्पना राबविली. काही मतदान केंद्राची आकर्षक सजावट करण्यात आली होती. यामुळे मतदारांचा उत्साह वाढविण्यास मदत झाली होती.

दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांना झाली मदत
निवडणूक विभागाने सर्व मतदान केंद्रावर दिव्यांग आणि वयोवृध्द मतदारांची अडचण होऊ नये यासाठी सर्वच मतदान केंद्रावर व्हीलचेअरची व्यवस्था केली होती. त्यामुळे त्यांना मतदान केंद्रातील बूथपर्यंत जाण्यास मोठी मदत झाली.

नवमतदारांमध्ये उत्साह
लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकी दरम्यान नवमतदारांच्या संख्येत वाढ झाली. जिल्ह्यातील चारही मतदारसंघात १८ ते १९ या वयोगटातील एकूण २६ हजार ५६४ मतदार आहेत.यापैकी बहुतेक युवा मतदारांनी प्रथमच मतदानाचा हक्क बजाविला. त्यामुळे त्यांच्यात उत्साह दिसून येत होता.

मतदारांचा कौल कुणाला? गुरूवारी कळणार
सोमवारी जिल्ह्यातील चारही मतदारसंघातील निवडणूक रिंगणात असलेल्या ४७ उमेदवारांसाठी मतदान घेण्यात आले. यात ७० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.२४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार असून मतदारांचा कौल नेमका कुणाला होता हे गुरूवारी मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.

कल कुणाचा हे जाणून घेण्यासाठी उत्सुकता
सोमवारी मतदान प्रक्रियेदरम्यान चारही विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राबाहेर उमेदवाराचे समर्थक भाऊ कोण चालत आहे अशी विचारणा करीत असल्याचे चित्र होते. मतदारांकडून मिळत असलेल्या चर्चेवरुन उमेदवारांचे समर्थक मनातल्या मनात खूश दिसून येत होते.

मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यास विलंब
निवडणूक निर्णय विभागाकडून सकाळी ७ ते ९, ९ ते ११, ११ ते १, १ ते ३, ३ ते ५ अशा टप्प्यात जिल्ह्यातील चारही मतदारसंघातील मतदानाची आकडेवारी जाहीर केली जात होती.मात्र अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यास प्रशासनाकडून फार विलंब लावला जात होता. त्यामुळे अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली.

सेल्फी विथ व्होटरची क्रेज
निवडणुक विभागाने यंदा मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शाळा महाविद्यालयात अनेक जनजागृती उपक्रम राबविले.पथनाट्याच्या माध्यमातून मतदारांना त्यांच्या एका मताचे किती महत्त्व आहे हे पटवून दिले. सोमवारी मतदान प्रक्रियेदरम्यान अनेक मतदान केंद्रावर सेल्फी विथ वोटरसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. यामुळे सेल्फी विथ वोटरसह फोटो घेण्यासाठी युवकांचा कल दिसून आला.

समजुतीनंतर बहिष्कार मागे
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोरी, बंध्या (वडेगाव) येथील गावकऱ्यांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकत असल्याचे पत्र प्रशासनाला दिले होते. मात्र तहसीलदार विनोद मेश्राम यांनी गावकऱ्यांशी चर्चा करुन त्यांची समजूत काढली त्यानंतर गावकºयांनी बहिष्कार मागे घेत मतदान प्रक्रियेत भाग घेतला.

Web Title: Maharashtra Election 2019 : 47 Candidates' fate EVMband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.