उद्या घरोघरी श्रींचे आगमन; गणेशोत्सवाने सर्वत्र उत्साहाचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 07:34 IST2025-08-26T07:32:39+5:302025-08-26T07:34:02+5:30
नोकरी, व्यवसायानिमित्त गोव्याबाहेर असणारे लोक चतुर्थीनिमित्त मूळगावी दाखल झाले आहेत.

उद्या घरोघरी श्रींचे आगमन; गणेशोत्सवाने सर्वत्र उत्साहाचे वातावरण
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी राज्यात जय्यत तयारी सुरू आहे. उद्या, बुधवारी घरोघरी गणरायाचे आगमन होणार असल्याने राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे. बाप्पांसाठी आकर्षक आरास, मखर, तसेच माटोळी बांधण्याचे काम सुरू आहे.
नोकरी, व्यवसायानिमित्त गोव्याबाहेर असणारे लोक चतुर्थीनिमित्त मूळगावी दाखल झाले आहेत. अनेकांच्या घरी दीड दिवस, पाच, सात, नऊ आणि ११ दिवस असे गणपतीचे पूजन केले जाते. महिला वर्ग नेवऱ्या, लाडू, मोदक आणि इतर गोडधोड पदार्थ चतुर्थीनिमित्त बनविण्याच्या तयारीत आहेत,
तर भजन, घुमट आरती, फुगडी, तसेच अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाचीही तयारी केली जात आहे.
दरम्यान, राज्यात गौरीपूजनाचेही खास आकर्षण असते. चतुर्थीच्या पाचव्या दिवशी गौरीपूजन केले जाते. गावात महिला गौरीचे पाणी आणायला जातात. वाजत गाजत देवी घरात आणली जाते. नंतर सायंकाळी देवीचे विसर्जन केले जाते, तसेच काही भागांत सुवासिनी महिला हौसा घेऊन गौरी-गणपतीला पाया पडायला जातात. राज्यात बहुतांश भागात अजून विविध पद्धतीने चतुर्थी साजरी केली जात आहे.