आरमोरी तालुक्यातील ३६ हजार हेक्टर सिंचन क्षमतेचा 'तुलतुली प्रकल्प' कागदावरच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 18:39 IST2025-07-21T18:38:30+5:302025-07-21T18:39:50+5:30

वनकायद्याचा खोडा : २ हजार हेक्टर वनजमिनीचे हस्तांतरण रखडले; स्थानिकांचाही विरोध

'Tultuli Project' with irrigation capacity of 36 thousand hectares in Armori taluka is only on paper! | आरमोरी तालुक्यातील ३६ हजार हेक्टर सिंचन क्षमतेचा 'तुलतुली प्रकल्प' कागदावरच !

'Tultuli Project' with irrigation capacity of 36 thousand hectares in Armori taluka is only on paper!

लोकमत न्यूज नेटवर्क
मानापूर:
आरमोरी तालुक्याच्या तुलतुली गावाजवळ जिल्ह्यातील सर्वात मोठ्या सिंचन प्रकल्पाला ४५ वर्षापूर्वी मान्यता मिळाली. दहा वर्षांनंतर किरकोळ कामांना सुरुवातही झाली. या प्रकल्पाचे धरण क्षेत्रातील प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वीच १९८० चा वनकायदा आड आला. प्रकल्पामुळे बुडीत क्षेत्रवाढीचा धोका ओळखून स्थानिक व परिसरातील शेतकऱ्यांनीही विरोध केल्याने प्रकल्पाचे काम पुढे सरकले नाही, ते कागदावरच राहिले.


मानापूर (देलनवाडी) परिसरातील तुलतुली गावाजवळ खोब्रागडी नदीवर १७ डिसेंबर १९७८ रोजी सिंचन प्रकल्पास मान्यता मिळाली. त्यावेळी प्रकल्प किंमत १९.१५ कोटी रुपये होती. या प्रकल्पामुळे ३६ हजार ७७२ हेक्टर शेती सिंचनाखाली येणार होती, तसेच प्रकल्पात एकूण २८४.८७ द.ल.घ.मी. पाणीसाठा क्षमता होती. या प्रकल्पाकरिता २२२८.०६ हेक्टी वनजमिनीची आवश्यकता होती; परंतु केंद्र शासनाने ३ ऑगस्ट १९९९ व ९ एप्रिल २००२ रोजी दोनवेळा वनजमिनीस मान्यता नाकारली. मात्र, तत्पूर्वी प्रकल्पाच्या प्राथमिक कामाला १९८० मध्ये सुरुवात झाली होती. त्यावेळी धरणस्थळाकरिता पोचमार्ग, स्थायी/अस्थायी इमारत, गोदाम, धरणस्थळाचे स्ट्रिपिंग ही कामे मे १९८३ पर्यंत सुरू होती. 


नियामक मंडळाकडून 'जैसे थे'चे आदेश

  • केंद्र शासनाच्या निर्देशानुसार प्रकल्पनिर्मितीतील अडचण दूर करण्यासाठी व पर्यायी प्रकल्प होण्याच्या दृष्टीने अभ्यास नागपूर पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण मंडळाने प्रकल्पाचा अभ्यास केला. ११ जून २०१० मध्ये प्रकल्पाची पूर्ण संचय पातळी २४३.८० मी.ऐवजी २३८ मीटरपर्यंत घटवून नागपूर जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे अहवाल पाठविला.
  • मात्र, प्रकल्पासाठी निश्चित केलेली वनजमीन कमी केली नसल्याचे कारण पुढे करून सदर प्रकल्प रद्द करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक कार्यालयास पाठविला. त्यानंतर नियामक मंडळाच्या बैठकीत सदर प्रकल्प रद्द करणे संयुक्तिक नाही, असे ठरवून प्रकल्प 'जैसे थे' ठेवण्यात आला.


६.२१ कोटींचा खर्च
तुलतुली प्रकल्पाच्या बाह्यक्षेत्रातील विविध कामांवर मार्च २०१९ अखेर ६.२१ कोटी रुपयांचा खर्च झालेला आहे. प्रकल्पासाठी मंजूर झालेला १२.९५ कोटी निधी अखर्चित आहे. दरम्यान, दवंडी व मांगदा या ठिकाणी कर्मचारी वसाहत बांधण्यात आली. मात्र, सध्या येथील इमारती मोडकळीस आल्या आहेत. याशिवाय धरण, बॅरेज, पंपगृह, कालवा डावा/उजवा, शाखा, वितरिका, लघुकालवे, तसेच इतर कामांवर निधी खर्च प्रस्तावित होता.


४० गावे २२५४.९२८ हेक्टर खासगी जमीन बुडीत क्षेत्रात जाणार
पुनर्वसनासाठी प्रस्तावित होते. यात २ हजार २३७ घरे व १० हजार ३५४ लोकसंख्येचा समावेश होता. आता ही लोकसंख्या व वस्त्याही वाढलेल्या आहेत.


"तुलतुली परिसरात जंगल व अन्य वनसंपदा आहे. लोकांची उपजीविका जंगलावर आधारित आहे. प्रकल्पामुळे हजारो हेक्टर वनजमीन बाधित होण्याचा धोका होता. याच कारणाने स्थानिक नागरिकांनी प्रकल्पनिर्मितीस विरोध केला. हा प्रकल्प बुडीत क्षेत्र वाढविणारा आहे."
- भजन मडकाम, नागरिक तुलतुली तथा माजी सभापती पं.स., आरमोरी


"तुलतुली प्रकल्पासाठी वनजमिनीच्या हस्तांतरणाची मान्यता शासनाकडून मिळाली नाही. त्यामुळे या प्रकल्पाचे काम सद्यःस्थितीत बंदच आहे. शासनाकडून मान्यता मिळत नसल्याने अडचणीत आहेत."
- एच. एस. कछवा, उपविभागीय अधिकारी, तुलतुली प्रकल्प 


 

Web Title: 'Tultuli Project' with irrigation capacity of 36 thousand hectares in Armori taluka is only on paper!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.