Maharashtra Election 2019; दारूमुक्त निवडणुकीला गडचिरोलीतील नऊ उमेदवारांचा पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 18:24 IST2019-10-19T18:23:01+5:302019-10-19T18:24:45+5:30
गडचिरोली विधानसभा मतदार संघातील नऊ उमेदवारांनी निवडणुकीदरम्यान मतदारांना दारूचे प्रलोभन देणार नाही आणि दारूचा वापर करणार नाही असे सांगत दारूबंदीला माझे समर्थन आहे असे लेखी वचन दिले आहे.

Maharashtra Election 2019; दारूमुक्त निवडणुकीला गडचिरोलीतील नऊ उमेदवारांचा पाठिंबा
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी विधानसभा मतदार संघातील प्रमुख राजकीय पक्षांच्या व अपक्ष मिळून नऊ उमेदवारांनी दारूमुक्त निवडणुकीच्या आवाहनाला प्रतिसाद देत निवडणुकीदरम्यान मतदारांना दारूचे प्रलोभन देणार नाही आणि दारूचा वापर करणार नाही असे सांगत दारूबंदीला माझे समर्थन आहे असे लेखी वचन दिले आहे.
जिल्ह्यातील ६०० गावांनी आपापल्या गावात दारूबंदी लागू केली आहे. १२० ग्रामपंचायतींच्या २८७ गावांनी ग्रामसभेत दारूमुक्त निवडणूक घेण्याचा ठराव पारित केला. उमेदवारांना निवडणूक प्रचारादरम्यान दारूचा वापर करू देणार नाही, दारूचा स्वीकार करणार नाही, तसेच शुद्धीत राहूनच मतदान करणार, असे ठराव त्यांनी घेतले आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये दारूमुक्त निवडणूक घेण्यासाठी महिला, युवा व पुरु ष मतदारांनी रॅली काढून, सभा घेऊन उमेदवारांना दारूमुक्त निवडणुकीसाठी आवाहन केले. सोबतच दारूबंदीला समर्थन करण्याचे वचन लिहून देण्याचे आवाहन मुक्तिपथ अभियानाचे संस्थापक डॉ.अभय बंग यांनी केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देत आरमोरी विधानसभा मतदार संघातील कृष्णा गजबे, गडचिरोली मतदार संघातील डॉ. देवराव होळी, डॉ.चंदा कोडवते, गोपाल मगरे, जयश्री वेळदा, सागर कुंभरे तर अहेरी विधानसभा मतदार संघातील धर्मरावबाबा आत्राम, दीपक आत्राम, लालसू नोगोटी या उमेदवारांनी संकल्प लिहून दिला. लिखित वचनासोबत त्यांनी व्हिडिओवर देखील वचन पक्के केले आहे. या अभियानामुळे दारूमुक्त निवडणूक तसेच दारूबंदी या दोन्हींना बळकटी मिळाली.