चार वर्ष उलटली तरी जि.प शाळेच्या वर्गखोलीचे कोसळलेले छत ‘जैसे थे’च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2022 14:16 IST2022-06-30T14:10:38+5:302022-06-30T14:16:42+5:30
२०१८ मध्ये जून ते जुलै या महिन्यात चक्रीवादळामुळे शाळेच्या एका वर्गखोलीचे छत उडून खाली कोसळले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात बसण्यास अडचण निर्माण झाली. सदर वर्ग खोलीत गेल्या चार वर्षांपासून शिकवणीचे वर्ग बंद आहेत.

चार वर्ष उलटली तरी जि.प शाळेच्या वर्गखोलीचे कोसळलेले छत ‘जैसे थे’च
चामोर्शी (गडचिरोली) : तालुक्यातील मोठे गाव असणाऱ्या कुनघाडा रै. येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या एका वर्गखोलीचे छत चार वर्षांपूर्वी कोसळले होते. ते आजही त्याच अवस्थेत पडलेले आहे. त्या छताची दुरूस्ती करण्याची गरज जिल्हा परिषदेला वाटली नाही का? पंचायत समितीने त्याचे गांभीर्य शिक्षण विभागाला सांगितले नाही का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने आता विचारले जात आहेत.
कुनघाडा रै. येथे पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषद केंद्र शाळा आहे. या शाळेत २३८ विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे. मुख्याध्यापकासह ६ शिक्षक कार्यरत आहेत. २०१८ मध्ये जून ते जुलै या महिन्यात चक्रीवादळामुळे शाळेच्या एका वर्गखोलीचे छत उडून खाली कोसळले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात बसण्यास अडचण निर्माण झाली.
सदर वर्ग खोलीत गेल्या चार वर्षांपासून शिकवणीचे वर्ग बंद आहेत. शालेय प्रशासनाने गंभीर बाब लक्षात घेऊन तत्काळ छत दुरुस्त करून विद्यार्थ्यांची अडचण दूर करावी अशी मागणी शाळा व्यवस्थापन समिती व पालक वर्गाने केली आहे.
शाळा समितीचा ठराव केराच्या टोपलीत?
कोसळलेल्या छतामुळे विद्यार्थ्यांना धोका होऊ नये व वर्गखोलीची पूर्ववत व्यवस्था करून देण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने ठराव घेऊन छत दुरुस्तीबाबत स्थानिक ग्रामपंचायत आणि पंचायत समिती स्तरावर वेळोवेळी निवेदने देऊन पाठपुरावा केला. मात्र संबंधित प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्यामुळे शाळा समितीच्या ठरावाला केराची टोपली दाखवली का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता त्या वर्गखोलीची आणखी जास्त दुरवस्था झाली असून वादळाने वर्गखोलीचे छत पूर्णपणे उडाले आहे.