गेल्या काही दिवसांपासून 'छावा' (Chhaava) सिनेमाने थिएटर आणि बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. १४ फेब्रुवारी रोजी रिलीज झालेल्या सिनेमाने पहिल्या दिवसापासूनच भरघोस कमाईला सुरुवात केली. मात्र काल रविवारी दहाव्या दिवशी 'छावा'च्या कमाईत जरा घट झाली. याला कारण ठरला 'भारत विरुद्ध पाकिस्तान' सामना. छावाने रविवारी नेमके किती कोटी कमावले वाचा.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा'चं जगभरात कौतुक होत आहे. विकी कौशलच्या अभिनयाने सर्वांना भारावून टाकलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर दाखवण्यात मेकर्सला यश आलं आहे. सिनेमाची आतापर्यंतची एकूण कमाई ३२६.७२ कोटींची झाली आहे. सॅकनिल्क रिपोर्टनुसार, पहिल्याच आठवड्यात सिनेमाने २१९.२५ कोटी कमावले होते. तर गेल्या शुक्रवारी २३.५० कोटींचा बिझनेस केला. शनिवारी कमाईत ८७.२३ टक्क्यांनी वाढ झाली. शनिवारचा आकडा थेट ४४ कोटी होता. तर काल रविवारी असूनही सिनेमाने ४० कोटी कमावले. शनिवारच्या तुलनेत हा आकडा कमी आहे. याचं कारणही तसंच आहे. काल झालेल्या भारत विरुद्ध पाक सामन्यामुळे सिनेमाला थोडा फटका बसला. तरी अद्याप मेकर्सने अधिकृत आकडे जाहीर केलेले नाहीत.
'छावा' सिनेमा एकूण १३० कोटी बजेटमध्ये बनला आहे. त्यामुळे सिनेमाने पहिल्या दोनच दिवसात बजेट वसूल केलं. एकूणच क्रेझ पाहता सिनेमा येत्या काही दिवसात आणखी काही रेकॉर्ड मोडेल असा अंदाज आहे. मॅडॉक फिल्म्सने सिनेमाची निर्मिती केली असून विकी कौशल, रश्मिका मंदाना, आशुतोष राणा, दिव्या दत्तासह अनेक कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.