अक्षय कुमारचे (Akshay Kumar) सिनेमे सध्या बॉक्सऑफिसवर फारशी कमाल दाखवत नाहीयेत. गेल्या काही वर्षात त्याचे सिनेमे सलग आपटले आहेत. अक्षयने एकामागोमाग एक देशभक्तीपर चित्रपटही केले. मात्र यामुळे त्याची पत्नी ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) थोडी नाराज झाली आहे. अक्षयच्या सिनेमांच्या निवडीवर तिने आक्षेप घेतला आहे. नुकतंच अक्षयने ट्विंकलच्या या प्रतिक्रियेचा खुलासा केला आहे.
गेल्या काही वर्षातले अक्षय कुमारचे चित्रपट पाहिले तर त्यात 'हॉलिडे', 'बेबी', 'एअरलिफ्ट', 'मिशन मंगल', 'गोल्ड', 'केसरी' आणि आता नुकताच रिलीज झालेला 'स्काय फोर्स' या देशभक्तीपर सिनेमांचा समावेश आहे. ३० वर्षांच्या करिअरमध्ये अक्षयने कॉमेडी, रोमँटिक, अॅक्शन सिनेमेही केले. मात्र त्याच्या या सिनेमांना आता प्रेक्षकांना फारसा प्रतिसाद देत नाहीयेत. अक्षय नुकतंच एका इव्हेंटमध्ये म्हणाला, "मी जेव्हापासून मी माझी स्वत:ची 'केप ऑफ गुड फिल्म्स' निर्मिती कंपनी सुरु केली तेव्हापासून मी देशप्रेमावर अनेक सिनेमे केले. मात्र यावरुन आणखी किती वेळा देशाला वाचवणार असं म्हणत माझी पत्नी मला चिडवते."
अक्षयला त्याच्या लवकर उठण्याच्या सवयीवरही प्रश्न विचारण्यात आला. यावर तो म्हणाला, "मला तुम्ही स्टार म्हणू नका. कारण स्टार रात्री दिसतात. मला दिवसा बाहेर पडायचं असतं. मला सूर्य म्हणा."
अक्षय कुमारचा 'स्काय फोर्स' सिनेमा बऱ्यापैकी चालला. यामध्ये वीर पहाडिया आणि सारा अली खानचीही भूमिका होती. यानंतर अक्षय विष्णू मांचू आणि प्रभाससोबत 'कन्नप्पा' या पॅन इंडिया सिनेमात दिसणार आहे. शिवाय 'जॉली एलएलबी ३','हाऊसफुल ५','वेलकम टू जंगल','हेरा फेरी ३' हे सिनेमेही प्रदर्शनाच्या रांगेत आहेत.