Join us

"मॅडम, आधी बॉक्स ऑफिस कलेक्शन बघा", 'टॉयलेट एक प्रेमकथा'च्या निर्मात्यांनी जया बच्चन यांना सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 18:39 IST

अक्षय कुमारच्या 'टॉयलेट एक प्रेमकथा' सिनेमावर जया बच्चन यांनी टिप्पणी केली होती. त्यांना आता सिनेमाच्या प्रोड्युसरने उत्तर दिलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार असलेल्या जया बच्चन त्यांच्या वक्तव्यामुळे कायमच चर्चेत असतात. त्यांनी नुकतंच अक्षय कुमारच्या 'टॉयलेट एक प्रेमकथा' सिनेमाबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत आलं होतं. सिनेमाच्या नावावरुन त्यांनी टिप्पणी केली होती. त्याबरोबरच हा सिनेमा फ्लॉप असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. यावर आता सिनेमाच्या निर्मात्यांनी प्रतिक्रिया देत सुनावलं आहे. 

'टॉयलेट एक प्रेमकथा'ची निर्माती प्रेरणा अरोराने बॉलिवूड हंगामाला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने जया बच्चन यांना उत्तर दिलं आहे. "मी हे सांगू इच्छिते की मी जया बच्चन यांची मोठी फॅन आहे. गुड्डी, उपहार, अभिमान आणि मिली हे त्यांचे सिनेमे मी कधीही आणि कुठेही पाहू शकते. त्यामुळेच त्यांनी आमच्या सिनेमाला फ्लॉप म्हणणं हे माझ्यासाठी खेदजनक आहे. मॅडमने आधी बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे बघितले पाहिजेत. आमच्या सिनेमाने चांगलं कलेक्शन केलं. २०१७ मधील टॉप ५ सिनेमांपैकी 'टॉयलेट एक प्रेमकथा' एक आहे", असं ती म्हणाली. 

पुढे प्रेरणा अरोरा म्हणाली, "सिनेमाच्या नावावरुन आम्हाला कन्फ्युजन होतं. सिनेमाच्या नावात प्रेम कथाच्या आधी टॉयलेट शब्द ठेवणं ही एक रिस्क वाटत होती. पण, शेवटी आम्ही हेच नाव निश्चित केलं. जसं जया बच्चन यांनी सिनेमात त्यांच्या भूमिका निवडताना जोखीम पत्करली तसंच मीदेखील एक निर्माता म्हणून सिनेमाच्या टायटलबाबत रिस्क घेतली होती. 'टॉयलेट एक प्रेमकथा' एक असा सिनेमा आहे. ज्यावर मला गर्व आहे. जया मॅमने परवानगी दिली तर मला हा सिनेमा त्यांना दाखवायला आवडेल".

काय म्हणाल्या होत्या जया बच्चन? 

"आता तुम्ही या सिनेमांचं नाव पाहा. मी तर असेल सिनेमे कधीच पाहणार नाही. टॉयलेट एक प्रेम कथा, हे काय नाव आहे? सिनेमाचं टायटल असं? कृपया तुम्हीच मला सांगा तुमच्यापैकी किती जण अशा नावाचा सिनेमा बघाल? हा सिनेमा फ्लॉप आहे". 

टॅग्स :जया बच्चनअक्षय कुमारसिनेमा