'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा अतिशय लोकप्रिय आणि लाडका कॉमेडी टीव्ही शो आहे. हास्यजत्रेने अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळवून दिली. यापैकीच एक म्हणजे समीर चौघुले. अभिनयाला विनोदाची झालर लावत टॅलेंटने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेल्या समीर चौघुलेंनी नुकतीच MHJ unplugged या सोनी मराठीच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या पॉडकास्टमध्ये समीर चौघुलेंनी त्यांच्या निधनाची बातमी वाचल्याचा किस्सा सांगितला. एकदा नव्हे तर दोनदा हा प्रकार घडल्याचंही चौघुलेंनी सांगितलं.
"एका सकाळी आपल्या दोघांनीही कळलं. चुकून कोणीतरी बातमी टाकली की समीर चौघुले गेले. नेमकं काय घडलं होतं?", असा प्रश्न अमित फाळके यांनी विचारला. तेव्हा समीर चौघुलेंनी स्वत:च्याच मृत्यूची बातमी ऐकल्याचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, "हे दोनदा असं घडलं आहे. एकदा पण एक अशीच बातमी पसरली होती. विजय चौघुले नावाचे पुण्यातले रंगकर्मी यांचं निधन झालं होतं. करोनामध्ये आपण ८०० खिडक्या ९०० दारं ही सिरीयल करायचो. ती मालिका मी लिहायचो आणि त्यात कामही करायचो. तेव्हा आपण घरातून आपल्याच मोबाईलवर शूट करायचो. त्यामुळे मी शूट करत होतो आणि मोबाईल फ्लाइट मोडवर होता. ऑलरेडी आपल्या ग्रुपवर हे कोणीतरी टाकलेलं होतं आणि सगळीकडे पसरलेलं होतं".
पुढे ते म्हणाले, "मला यातलं काहीच माहीत नव्हतं. हे मला पहिल्यांदा सईने सांगितलं. ती मला फोन करत होती. फोनवर मला म्हणाली की सम्या मला तुझा फक्त आवाज ऐकायचा होता. त्यानंतर तिने मला सगळं सांगितलं. मग त्या माणसाला मी सांगितलं आणि मग त्याने ती पोस्ट काढली. पण, एखादी गोष्ट आपण कन्फर्म न करता सगळ्यात आधी मला टाकायचं आहे हा जो आग्रह असतो. याच्यावर नंतर आपण स्किटही केलं होतं".
त्यानंतर अमित फाळके म्हणाले की "छगन चौघुले नावाचे एक संगीतकार होते त्यांचं करोनामध्ये निधन झालं होतं. सोनी मराठीच्या कार्यक्रमातही त्यांनी परफॉर्म केलं होतं. कोणीतरी त्यांच्या निधनानंतर छगन चौघुले यांना आदरांजली द्यायच्या ऐवजी समीर चौघुलेंचा फोटो वापरुन पोस्ट केली".