टीव्ही अभिनेत्री सृष्टी रोडे (Srishty Rode) युरोप ट्रीपवर असताना अचानक रुग्णालयात दाखल झाली. अनेक हिंदी मालिका तसंच बिग बॉस १२ मध्ये दिसलेल्या सृष्टीने तिचा रुग्णालयातील फोटो शेअर करत सविस्तर माहिती दिली. तिचे फोटो पाहून चाहते चिंतेत पडले आहेत. अनेक दिवसांपासून सृष्टी सोशल मिडियावरुनही गायब होती. आता त्याचं कारण समोर आलं आहे. सृष्टीला नक्की झालं काय?
सृष्टीने रुग्णालयातील बेडवरील फोटो शेअर केले आहेत. जे पाहून तिची अवस्था अगदीच गंभीर असल्याचं दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर ऑक्सिजन मास्कही लावला आहे. तसंच ती खूप अशक्त दिसत आहे. सृष्टीने या फोटोंसोबत लिहिले, "मला तुमच्या सगळ्यांसोबत एक गोष्ट शेअर करायची आहे. युरोप ट्रीपचे सर्व चांगले चांगले फोटो तर मी तुम्हाला दाखवले. पण एक कठीण वेळही आली होती. अॅमस्टरडॅममध्ये असताना मला न्युमोनिया झाला. माझी तब्येत खूप बिघडली. शरिरातलं ऑक्सिजनच कमी झालं आणि मला तात्काळ रुग्णालयात दाखल व्हावं लागलं. मी घाबरले होते. परत घरी जाऊन शकेन की नाही अशी मला भीती वाटत होती. माझी तब्येत इतकी बिघडली की मआझा व्हिसाही संपला होता. पण मी हिंमत हरले नाही."
ती पुढे लिहिते, "न्यूमोनियाशी लढा दिल्यानंतर मी अखेर मुंबईत परत आले आहे. पण माझी तब्येत अजूनही खराबच आहे. डॉक्टर म्हणाले की मला बरं व्हायला आणखी काही महिने लागू शकतात. हळूहळू माझी तब्येत सुधारत आहे. तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी काळजी व्यक्त केली त्याबद्दल आभार. तुमचं प्रेम माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. मी लवकर बरी होऊन परत येईन."
सृष्टीच्या या पोस्टवर अनेक कलाकार आणि चाहत्यांनी कमेंट करत तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. सृष्टीने 'ये इश्क हाये', 'छोटी बहू २', 'पुनर्विवाह', 'इश्कबाज' सारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.