'बिग बॉस मराठी ५' चा विजेता सूरज चव्हाण सोशल मीडियावर त्याच्या रिलमुळे चांगलाच चर्चेत असतो. अशातच सूरजने काही दिवसांपूर्वी एका मुलीसोबतचा फोटो पोस्ट केला होता. ही मुलगी नक्की कोण? असा प्रश्न सर्वांना पडला होता. अखेर सूरजची मानलेली बहिण अर्थात अंकिता वालावलकरने ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून सूरजची होणारी बायको आहे, असा खुलासा केला आहे. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला असून सूरजचं अभिनंदन केलंय.
सूरजचं लग्न ठरलं, अंकिता म्हणालीअंकिता वालावलकरने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन सांगितलं की, ''आज आम्ही सूरजच्या घरी गेलो होतो. सूरजचं नवीन घर बघितलं. सूरजच्या लग्नाला जाणं कदाचित मला शक्य नसल्याने ही एक सदिच्छा भेट होती. सूरजचं लग्न जमलेलं आहे, मुलगी सुद्धा खूप गोड आहे. लवकरच या सगळ्यांची गुड न्यूज तो तुम्हाला देणार आहे. मला सुद्धा आधी हे खोटं वाटलं होतं, पण त्यानेच मला हे सांगितलं आहे. सूरजला तुम्हाला सर्वांनाही ही गुड न्यूज द्यायची आहे. त्याने या सगळ्या गोष्टी गुपित ठेवल्या आहेत. तो लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे'', असा खुलासा करुन अंकिताने हा व्हिडीओ शेअर केला आहे. पुढे सूरज अंकिताला त्याच्या होणाऱ्या बायकोचा फोटो दाखवतो.
अंकितानेही सूरजच्या होणाऱ्या बायकोची भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. अशाप्रकारे अंकिताने ही गुड न्यूज सर्वांना सांगितली. अंकिताने सूरजच्या होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात सूरज लग्नाविषयी खुलासा करेल, अशी शक्यता आहे. विशेष म्हणजे सूरज गावी घर बांधतोय. या नवीन घरात सूरज त्याच्या बायकोचं स्वागत करणार, अशी चर्चा आहे. सध्या तरी सूरजची होणारी बायको कोण असेल, याचा सर्वजण अंदाज बांधत आहेत. 'बिग बॉस मराठी ५'नंतर सूरज 'झापुक झुपूक' या सिनेमात झळकला.