Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg boss फेम अभिनेत्याने कुत्र्याच्या साखळीने केली वडिलांना मारहाण; स्वत: केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 10:11 IST

वयाच्या १७ व्या वर्षी सिद्धार्थने वडिलांना केली मारहाण

Bigg boss 5 फेम अभिनेता आणि वीजे सिद्धार्थ भारद्वाज सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येत आहे. सिद्धार्थने लहान वयात अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला होता. अलिकडेच त्याने सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या बालपणावर भाष्य केलं. इतकंच नाही तर वयाच्या १७ व्या वर्षी त्याने त्याच्या वडिलांना कुत्र्याच्या साखळीने मारहाण केल्याची कबुलीदेखील या मंचावर दिली.

''माझे वडील एक गँगस्टर होते. त्यामुळे गँगमध्ये राहून लोकांना मारणं, त्यांना धमकावणं हेच त्यांचं काम होतं. दिल्लीतील कमला नगरमध्ये त्यावेळी त्यांचा दबदबा होता. परंतु, माझ्या जन्मानंतर त्यांच्यात बदल झाला. हे सगळं सोडून ते दुसऱ्या जागी रहायला गेले. मात्र, त्यांच्यातील ती जरब जराही कमी झाली नव्हती. मी ९ वर्षांचा होतो त्यावेळी माझ्या वडिलांना कोणीतरी ७ व्या मजल्यावरुन धक्का दिला होता. त्यानंतर माझ्या आईनेच त्यांची आणि घराची काळजी घेतली. याच काळात आलेल्या लाचारीमुळे माझे वडील डिप्रेशनमध्ये गेले होते. त्यामुळे ते त्यांचा राग माझ्या आईवर काढायचे'', असं सिद्धार्थ म्हणाला.

पुढे तो म्हणतो, ''माझे वडील रागाच्या भरात सतत माझ्या आईला मारायचे. ते जे बूट घालायचे त्याच बुटाने ते आईला सुद्धा मारहाण करायचे. जेव्हा लोक म्हणतात ना की, आम्ही डिप्रेशनमध्ये आहोत त्यावेळी तर असं वाटतं की आम्ही तर या काळात मरणयातना भोगल्या होत्या. जोपर्यत माणूस प्रसिद्ध आणि श्रीमंत होत नाही ना तोपर्यंत तुम्हाला कोणीही विचारत नाही. आणि, आम्ही असंच दुर्लक्षित बालपण जगलो आहोत. माझे वडील मला सुद्धा खूप मारायचे. त्यावेळी मी १६ वर्षांचा होता आणि मी सुद्धा त्यांचा प्रतिकार केला. मला वाटलं जर यांना वेळीच धडा शिकवला नाही तर हे असंच वागत राहतील. आणि, मी रागामध्ये कुत्र्याच्या साखळीने त्यांना मारलं.''

दरम्यान, बालपणी घडलेल्या या घटनांचा सिद्धार्थच्या कोवळ्या मनावर बराच परिणाम झाला होता. मात्र, यातून सावरुन त्याने त्याचं करिअर घडवलं. सिद्धार्थने बिग बॉससह एमटीव्ही रोडीज सारख्या शोमध्येही सहभाग घेतला होता.

टॅग्स :टेलिव्हिजनबिग बॉस १९सेलिब्रिटीटिव्ही कलाकार