Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मी माझ्या मंगळसूत्राचं वजन करू देणार नाही", मोदींच्या 'त्या' विधानानंतर मराठी अभिनेत्री संतापली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 09:06 IST

"माझं सोनं वाटून द्यायला तो सत्यनारायणाचा प्रसाद आहे?", मंगळसूत्र वादात मराठी अभिनेत्रीची उडी

सध्या देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातर्फे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीकाँग्रेसच्या जाहिरनाम्यावर टीका केली होती. काँग्रेस सर्वसामान्य जनतेच्या संपत्तीचं सर्वेक्षण करणार असून ते निवडून आले तर महिलांचं मंगळसूत्रदेखील हिसकावून घेतील असं मोदी म्हणाले होते. मोदींच्या या विधानानंतर सर्वत्र मंगळसूत्र वाद सुरू झाला आहे. याबाबत आता मराठी अभिनेत्री राधिका देशपांडेनेही पोस्ट शेअर केली आहे. 

मराठी अभिनेत्री राधिका देशपांडे अभिनयाबरोबरच तिच्या बेधडक स्वभावासाठीही ओळखली जाते. राधिका अनेकदा तिचं मत अगदी स्पष्टपणे मांडताना दिसते. सोशल मीडियाच्या माध्यमातून राधिका समाजातील घडामोडींबद्दल व्यक्त होताना दिसते.राधिकाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन तिचा जुना फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने सविस्तर पोस्ट लिहिली आहे. 

मंगळसूत्र वादात राधिकाची उडी

मी माझ्या मंगळसूत्राचं वजन करू देणार नाही. मी मंगळसूत्र घालीन किंवा नाही घालणार. माझं लग्नं नुकतंच झालं असो किंवा नसो. माझा नवरा माझा आहे आणि मी त्याची बायको आहे, ह्याची आठवण तुम्हाला करून देण्यासाठी मी मंगळसूत्र घालत नसते. त्यामुळे आत्ताच सांगते मी माझ्या मंगळसूत्राचं वजन करू देणार नाही. फरक पडतो. मुळात मंगळसूत्र कशासाठी, कोणासाठी, केंव्हा, कधी, कशाला ह्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला का देऊ? धमकी वजा सूचना समजा.

 

उत्तर द्यायची वेळ नाही पण आज मला प्रश्न नक्कीच पडला आहे. कोण होतात हे स्त्री धनाचा हिशोब, झडती, माहिती घेणारे? हे सगळं घेऊन माझं सोनं वाटून द्यायला तो सत्यनारायणाचा प्रसाद आहे? माझं सोनं हे माझं आहे, ते सौभाग्याचं लेणं आहे. आम्ही स्त्रिया सहज बोलता बोलता त्याला ‘प्रीटी ज्वेलरी‘ असं बोलून जातो. पण बहुतांश भारतीय स्त्रियांकरता सोनं, जे आई-वडिलांनी, सासु-सासऱ्यांनी दिलं आहे, जे तिच्या किंवा नवऱ्याच्या परिश्रमातून विकत घेतलं आहे, अशा सोन्याचं वजन किती बरं असेल? काही गोष्टी आकड्यात मोजता येत नसतात. अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेल्यांना ते नाही कळायचं. आम्ही स्त्रिया मंगळसूत्राला जीवापाड जपतो. काळजी पोटी ते ठराविक ठिकाणी घालत नाही. माझ्या घरात तर मंगळसूत्र ठेवायची एक स्वतंत्र जागा आहे. घर घ्यायची वेळ आली तेव्हा मी माझं सोन विकलं पण मंगळसूत्र मुठीतून सुटलं नाही. आणि ह्या धनाचा हिशोब आणि वाटप आम्ही होऊ द्यायचा? ह्या डाव्या नेत्यांच्या आणि त्यांच्या पार्टीच्या धोरणांच्या पूर्णत्वा करता! मागे टिकली/बिंदी वरून चर्चा उधळली, इतक्यात मंगळसूत्र चर्चेचा विषय ठरलं तर उद्या लग्न संस्कृती वर काहीतरी घणाघाती बोलतील. तर “मी माझ्या मंगळसूत्राचं वजन करू देणार नाही!” विषय संपला.

हा फोटो २००५ सालचा आहे, माझ्या लग्नातला. विधी सुरू होण्या आगोदरचा असल्यामुळे ह्यात मंगळसूत्र नाही पण तेंव्हा पासून हा दागिना सौभाग्याचं लेणं ठरला. फोटो जुना आहे पण जुनं ते सोनंच नाही का? म्हणूनच टिकवून ठेवायचं.

राधिकाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत.  

टॅग्स :टिव्ही कलाकारकाँग्रेसनरेंद्र मोदी