Pratyusha Banerjee: टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आज आपल्यात नाही. १ एप्रिल २०१६ ला प्रत्युषाने गळफास लावत आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येने अख्खी टीव्ही इंडस्ट्री हादरली होती. प्रत्युषाच्या मृत्यूनंतर तिचा लिव्ह इन पार्टनर आणि एक्स बॉयफ्रेंड राहुल राज सिंगला अटक करण्यात आली होती. राहुल राजनेच प्रत्युषाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं, असा आरोप ठेवण्यात आला होता. याप्रकरणी राहुल तीन महिने तुरूंगात होता. आता प्रत्युषाच्या निधनाच्या ७ वर्षानंतर राहुल राजने एक खळबळजनक दावा केला आहे.प्रत्युषाच्या मृत्यूच्या एक दिवस आधी तिने व राहुल राज दोघांनी पार्टी एन्जॉय केली होती. मग असं काय झालं की प्रत्युषाने आत्महत्या केली, असा प्रश्न आजतकच्या मुलाखतीत राहुल राजला विचारण्यात आला. यावर, ती आत्महत्या होती, हे मी मान्यच करू शकत नाही, असं तो म्हणाला.
काय म्हणाला राहुल राज?''मी त्याला आत्महत्या म्हणणार नाही. त्यादिवशी प्रत्युषा मला घाबरवण्यासाठी फक्त गळफास घेतल्याचा खोटा खोटा व्हिडीओ बनवत होती. ती अनेकदा असं करायची. त्या दरम्यान तिचा पाय सटकला असेल आणि तिला बॅलन्स बिघडला असेल, ज्यामुळे ती घटना घडली असावी,'', असं तो म्हणाला. ज्या दिवशी ती घटना घडली, त्या दिवसापासून दोन तीन दिवस मी माझ्यात नव्हतो. झोपेच्या गोळ्याही काम करत नव्हत्या. डॉक्टर इंजेक्शन देऊन झोपवण्याचा प्रयत्न करत होते. मी बोलायच्या स्थितीतच नव्हतो. ती आता नाहीये, याची जाणीव झाली आणि लगेच तिच्या मृत्यूसाठी मला जबाबदार ठरवलं गेलं. मी तिच्या मृत्यूला कसा कारणीभूत असू शकतो. एका रात्रीआधीच आम्ही पार्टी केली होती. मी तिला तिच्या कुटुंबाविरोधात कधीच भडकवलं नाही. ती स्वत:च तिच्या आईवडिलांच्या कर्जामुळे त्रासली होती. तिच्याकडे पैसे यायचे आणि ते कुटुंबाच्या कर्जाचे हफ्ते भरण्यात जायचे. ती चिडायची. मी तिला समजवायचो, असंही त्याने सांगितलं.