Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेफालीची इच्छा होती म्हणून परागने साजरा केला गणेशोत्सव, व्हिडीओ पाहून चाहते झाले भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 12:11 IST

शेफाली जरीवालाची इच्छा होती म्हणून तिचा पती पराग त्यागीने घरी गणेशोत्सवाची स्थापना केली आहे. परागने शेअर केलेला हा व्हिडीओ बघून सर्वांना शेफालीची आठवण आली आहे

अभिनेत्री शेफाली जरीवालाचं काहीच दिवसांपूर्वी निधन झालं.  शेफालीच्या निधनामुळे तिचा पती आणि अभिनेता पराग त्यागीला मोठा धक्का बसला. पराग सोशल मीडियावर शेफालीची आठवण जागवताना दिसतो. दरवर्षी पराग आणि शेफाली गणेशोत्सव साजरा करतात. मात्र शेफालीचं निधन झाल्याने पराग गणपती उत्सव साजरा करणार की नाही, असा सर्वांच्या मनात प्रश्न होता. परंतु पत्नी शेफालीच्या निधनानंतर तिच्या इच्छेनुसार परागने घरी गणपती बाप्पाचे स्वागत केले.

शेफालीची इच्छा होती म्हणून....२७ जून रोजी शेफालीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. तिच्या निधनानंतरही परागने गणेशोत्सवाची ही परंपरा कायम ठेवली. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात तो गणपती बाप्पाला घरी घेऊन येताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये पराग बाप्पाची आरती करताना आणि त्यानंतर गणपतीच्या मूर्तीला थेट शेफालीच्या फोटोसमोर घेऊन जाताना दिसतो. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘माझी परी नेहमीच अशी इच्छा बाळगून होती की बाप्पाने आपल्या घरी येणे कधीही थांबवू नये.’

परागच्या या निर्णयाला त्याच्या कुटुंबियांनीही सपोर्ट केला. त्याने आपल्या सासूचे, म्हणजेच शेफालीच्या आईचेही आभार मानले, कारण मुलगी गमावल्यानंतरही शेफालीच्या आईने या दुःखद वातावरणात लेकीची इच्छा म्हणून गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. परागच्या या कृतीमुळे त्याचे चाहते खूप भावुक झाले आहेत. अनेकांनी कमेंट करून त्याला धीर दिला आहे. याशिवाय शेफालीवर परागचं किती प्रेम आहे, हेच या कृतीतून पाहायला मिळतं.

टॅग्स :गणेशोत्सव 2025टेलिव्हिजनबॉलिवूडमृत्यूशेफाली जरीवालाटिव्ही कलाकारसेलिब्रिटी गणेश