'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो' हा सध्या नेटफ्लिक्सवरील चर्चेतला शो. कपिल शर्मा शोला प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळतंय. या शोमध्ये विविध सेलिब्रिटी, राजकारणी, स्टँड अप कॉमेडियन, राजकीय कवी सहभागी दिसतात. पण आता कपिल शर्मा शो चांगलाच अडचणीत आला आहे. कारण या शोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इशारा दिला आहे. बॉम्बे नाही तर मुंबई म्हणा, असा इशारा मनसे नेते अमेय खोपकर यांनी पोस्ट लिहून दिला आहे. जाणून घ्या नेमकं प्रकरण
कपिल शर्मा शोला मनसेचा इशारा
अमेय खोपकर यांनी 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'मधील एका एपिसोडची क्लीप x वर शेअर केली आहे. या क्लिपमध्ये कपिल शर्मा शोमध्ये सहभागी झालेली हुमा कुरेशी मुंबईबद्दल बोलताना बॉम्बे असा उल्लेख करतात.
त्यावर राग व्यक्त करुन अमेय खोपकर लिहितात, ''#BombaytoMumbai बॉम्बेचे मुंबई अधिकृत नामकरण होऊन ३० वर्षे झाली तरी अजूनही बॉलिवूड मधील कपिल शर्मा शो यात सेलिब्रिटी गेस्ट, दिल्लीस्थित राज्यसभा खासदार, शो अँकर आणि अनेक हिंदी चित्रपटात सर्रास बॉम्बे हा उल्लेख होत आहे. १९९५ महाराष्ट्र शासन व १९९६ मध्ये केंद्र शासनाची अधिकृत मान्यता मिळून चेन्नई, बेंगळुरू, कोलकाताच्याही आधी मुंबई झाले आहे. तरी याचा मान राखून मुंबई उल्लेख करावा हा विनंतीवजा इशारा देण्यात येत आहे.'' अशी पोस्ट अमेय खोपकर यांनी केली आहे.