यंदाही गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. १० दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर आपल्या लाडक्या बाप्पाला भाविकांनी निरोप दिला. मुंबई आणि पुण्यात भव्य विसर्जन मिरवणुकाही निघाल्या. मुंबईतीला प्रसिद्ध आणि नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या लालबागचा राजाची मिरवणुकही २२ तास चालली. पण, त्यानंतर जेव्हा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर पोहोचला तेव्हा मात्र वेगळ्याच अडचणी समोर उभ्या राहिल्या.
लालबागचा राजा जेव्हा सकाळी ८ वाजता विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर पोहोचला तेव्हा समुद्राला भरती आली होती. यंदा लालबागचा राजा विसर्जनासाठी गुजरातवरुन खास अत्याधुनिक तराफा मागवण्यात आला होता. परंतु, भरतीमुळे लालबागचा राजाची मूर्ती तराफ्यात ठेवण्यात अडचणी निर्माण होत होत्या. अखेर अथक प्रयत्नांनंतर ओहोटी आल्यानंतर बाप्पाची मूर्ती तराफ्यात ठेवण्यात यश आलं. त्यामुळे राजाला विसर्जन करण्यासाठी रात्री ९ वाजले. लालबागचा राजा विसर्जनावरुन अनेकांनी त्यांची मतं व्यक्त केली आहेत. मराठी अभिनेत्रीनेही सोशल मीडियावर पोस्ट करत लालबागचा राजा मंडळाला टोला लगावला आहे.
"बहुतेक गुजरातवरुन विसर्जनासाठी आणलेला महागडा तराफा लालबागचा राजाला आवडला नसावा. राजाला आपल्या कोळी बांधवांची सवय आहे ना, काय करणार...", असं म्हणत अभिनेत्री आरती सोळंकी हिने पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट व्हायरल झाली आहे.
आजपर्यंत लालबागचा राजाच्या विसर्जनाला कधीही इतका वेळ लागला नव्हता. यापूर्वी अनेक वर्षे लालबागचा राजाचे विसर्जन हे कोळी बांधवांच्या मदतीने केले जात होते. यंदा विसर्जनासाठी गुजरातवरून आणलेला तराफा वापरला गेला. इतर सार्वजनिक मंडळांच्या गणपतींच्या विसर्जनासाठी बोटी वापरण्यात आल्या. मात्र, लालबाग राजा मंडळाने तराफ्यावरूनच विसर्जन करायचे, हा निर्णय कामय ठेवला. त्यामुळे याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.