Join us
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडाची लॉटरी अन् बायकोचं नवीन क्लिनिक, 'हास्यजत्रा' फेम दत्तू मोरेचं नशीब फळफळलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 11:49 IST

चाळीतून थेट फ्लॅटमध्ये जाणार दत्तू मोरे!

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra)  कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला कलाकार दत्तू मोरे (Dattu More) याची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. दत्तूने हास्यजत्रेतून प्रेक्षकांच्या मनात स्वत:चं स्थान निर्माण केलं. हास्यजत्रेने त्याला खरी लोकप्रियता दिली आणि दत्तू जिथे राहतो ती चाळही 'दत्तू चाळ' नावाने ओळखली जाऊ लागली. दत्तू गेल्या अनेक वर्षांपासून ठाण्यातील छोट्याशा चाळीतच राहतो. अगदी लोकप्रियता मिळाल्यानंतरही तो चाळीतच राहायचा म्हणून चाळीला नंतर 'दत्तू चाळ'च नाव पडलं. पण आता दत्तू चाळीतून थेट आलिशान फ्लॅटमध्ये शिफ्ट होणार आहे. कारण त्याला म्हाडाच्या कोकण मंडळाने काढलेली घरांची लॉटरी लागली आहे.

हास्यजत्रा फेम दत्तू मोरेचं घर घेण्याचं स्वप्न आता पूर्ण झालं आहे. चाळ सोडून तो आता फ्लॅटमध्ये शिफ्ट होणार आहे. त्याला म्हाडा कोकण मंडळाने काढलेल्या लॉटरीत एक नाही तर दोन घरे लागली आहेत. तो सध्या ठाण्यातील वागळे इस्टेट येथील रामनगर भागातल्या चाळीत राहतो. त्याने म्डाच्या कोकण मंडळातर्फे काढलेल्या घरांच्या लॉटरीसाठी अर्ज भरला होता. एकूण २५ हजार सर्वसामान्यांनी यामध्ये अर्ज केले होते. या लॉटरीत दत्तूचं नशीब चाललं असून त्याला ठाण्यात दोन घरे लागली आहेत. रौनक ब्लिझ आणि हायलँड स्प्रिग या दोन गृहप्रकल्पात दत्तूचं नशीब फळफळलं आहे.

चाळ सोडायची म्हणल्यावर दत्तू भावना व्यक्त करताना म्हणाला, "मला पहिल्याच प्रयत्नात म्हाडाचे घर लागले याचा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही. चाळीत राहताना टोलेजंग इमारती बघून मीही इतरांसारखंच फ्लॅटमध्ये घर घेण्याचं स्वप्न पाहिलं होतं. आता ते पूर्ण होत आहे. मात्र चाळीत लहानाचा मोठा झाला असल्याने आता फ्लॅट संस्कृतीत मी किती रमेन माहित नाही. चाळीबाबत माझ्या मनात काय आत्मियता राहील."

दत्तूसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे त्याच्या बायकोने ठाण्यात तिचं पहिलं क्लिनिक सुरु केलं आहे. बायकोला शुभेच्छा देत त्याने खास पोस्टही शेअर केली आहे. घुनागे हॉस्पिटलनंतर ठाण्यातलं पहिलं क्लिनिक म्हणत त्याने बायकोचं अभिनंदन केलं आहे. दत्तूची बायको स्त्री रोग तज्ञ आहे.

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटेलिव्हिजनसेलिब्रिटीठाणेसुंदर गृहनियोजनम्हाडा