Join us

इंडियन आयडॉल मराठी: अशोक सराफ यांना 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री देणार सरप्राइज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 18:56 IST

Ashok saraf: विनोदाचं उत्तम टाइमिंग आणि अफलातून अभिनयशैली यांच्या जोरावर गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे अशोक सराफ.

विनोदाचं उत्तम टाइमिंग आणि अफलातून अभिनयशैली यांच्या जोरावर गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे अशोक सराफ. 'अशी ही बनवाबनवी', 'चंगूमंगू', 'नवरी मिळे नवऱ्याला', 'वाजवा रे वाजवा', 'जमलं हो जमलं' अशा कितीतरी चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यामुळे आजही त्यांची क्रेझ प्रेक्षकांमधून यक्तिंचितही कमी झालेली नाही. यामध्येच आता ते 'इंडियन आयडॉल मराठी'च्या मंचावर हजेरी लावणार आहेत. विशेष म्हणजे यावेळी त्यांना एक छानसं सरप्राइज मिळणार आहे.

 'इंडियन आयडॉल मराठी'मध्ये आता शेवटचे टॉप ६ स्पर्धक राहिले आहेत. त्यामुळे या स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी अभिनेता अशोक सराफ उपस्थित राहणार आहेत. मात्र, या मंचावर आल्यानंतर त्यांनाच एक गोड सरप्राइज मिळणार आहे. या सरप्राइजमधून त्यांच्या अशी ही बनवाबनवी चित्रपटाच्या जुन्या आठवणी नक्कीच ताज्या होणार आहेत.

अशोक सराफ यांच्या लेकाला कधी पाहिलंय का? अभिनय सोडून 'या' क्षेत्रात कमावतोय नाव

अशोक मामा या शोमध्ये सहभागी झाल्यानंतर टॉप ६ स्पर्धक खास अशोक मामांच्या चित्रपटातील गाणी सादर करणार आहेत. याचवेळी अशोक मामांना सरप्राइज देण्यासाठी अभिनेत्री अश्विनी भावेदेखील या मंचावर उपस्थित राहणार आहे.

'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटात अशोक सराफ आणि अश्विनी भावे यांनी एकत्र स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटात अश्विनी यांनी अशोक सराफ यांच्या बॉसची भूमिका साकारली होती. त्यामुळे त्यांची या मंचावर अशोक मामांसोबत होणारी भेट प्रेक्षकांसाठीही खास ठरणार आहे. तसंच यावेळी अशोक सराफ व अश्विनी भावे त्यांच्या जुन्या आठवणींनाही उजाळा देणार आहेत.

दरम्यान, मराठी मनोरंजनसृष्टी ज्यांना 'अशोक मामा' म्हणून ओळखते त्यांनी फक्त विनोदी भूमिका नाहीत तर गंभीर भूमिका सुद्धा चोखपणे बजावल्या आहेत आणि म्हणूनच काही मोजक्या चतुरस्त्र अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना होते. 

टॅग्स :अशोक सराफअश्विनी भावेसिनेमा