Join us

लोकप्रिय मराठी मालिकेत येणार 'गुलकंद' सिनेमाची स्टारकास्ट; व्हायरल प्रोमो पाहून चाहते झाले खुश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 13:55 IST

लोकप्रिय मराठी मालिकेत येणार 'गुलकंद' सिनेमाची स्टारकास्ट; प्रोमो व्हायरल

Lagnananatar Hoilch Prem: छोट्या पडद्यावरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. मालिकेत येणारे ट्विस्ट, वाद-विवाद तसेच कथानक या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. या मालिकेत मृणाल दुसानिस, ज्ञानदा रामतीर्थकर तसंच विवेक सांगळे, विजय  आंदळकर यांसारखी तगडी स्टारकास्ट आहे. दरम्यान, सोशल मीडियावर या मालिकेचा आगामी प्रोमो तुफान व्हायरल होताना दिसतोय. या मालिकेत लवकरच स्पेशल पाहूणे कलाकार येणार आहेत. गुलकंद सिनेमाच्या निमित्ताने चित्रपटातील संपूर्ण टीम लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत येणार आहेत. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

सध्या मराठी मनोरंजनविश्वात 'गुलकंद' या सिनेमाची प्रचंड चर्चा आहे. प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. याच सिनेमाच्या निमित्ताने सई ताम्हणकर, समीर चौघुले, प्रसाद ओक तसेच ईशा डे या कलाकारांनी लग्नानंतर होईल प्रेम च्या सेटवर खास हजेरी लावणार आहेत. 

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलंय की, काव्या-पार्थ आणि जीवा नंदिनी सगळे हॉलमध्ये त्यांची काम करत असतात. त्यानंतर अचानक  दरवाज्याची बेल वाजते. त्यानंतर नंदिनी- पार्थ म्हणतात, 'माझे पाहूणे आलेत!'. त्यांचं बोलणं ऐकून जीवा म्हणतो- एक मिनिट पण कोण आलंय हे बघितल्याशिवाय कसं कळणार? जीवाच्या प्रश्नावर उत्तर देत पार्थ त्याला म्हणतो- 'कळेलंच चल'! दरवाज्या उघडल्यानंतर 'गुलकंद' सिनेमाची स्टार कास्ट त्यांना समोर दिसते. मालिकेचा हा भाग आता कधी पाहायला मिळणार हे यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. इतकंच नाही तर समीर चौघुले आणि ईशा डे यांनी 'गुलकंद' मधील गाण्यावर मालिकेतील कलाकारांसोबत ठेका देखील धरला आहे. 

दरम्यान, 'गुलकंद' सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मजेदार कॉमेडी सिनेमा पाहायला मिळणार आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने प्रस्तुत आणि वेलक्लाऊड प्रॉडक्शन्स निर्मित, सचिन मोटे लिखित, सचिन गोस्वामी दिग्दर्शित ‘गुलकंद या चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत आणि शार्विल आगटे यांच्या मुख्य भूमिका आहेत. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया हे चित्रपटाचे निर्माते आहेत. हा सिनेमा १ मे २०२५ ला रिलीज होणार आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनमराठी चित्रपटसोशल मीडिया