Yogita Chavan Post: 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वातून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे योगिता चव्हाण (Yogita Chavan). अभिनेत्री योगिता चव्हाण ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. 'कलर्स मराठी' वाहिनीवरील गाजली मालिका 'जीव माझा गुंतला' या मालिकेच्या माध्यमातून ती नावारुपाला आली. योगिता चव्हाणसोबत या मालिकेत अभिनेता सौरभ चौघुले (Saorabh Choughule) देखील मुख्य भूमिकेत पाहायला मिळाला. या मालिकेनंतर अंतरा-मल्हार म्हणजेच अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेता सौरभ चौघुले आयुष्यभराचे जीवनसाथी झाले. दोघांनी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरूवात केली. दरम्यान, योगिता आणि सौरभ यांच्या बॉण्डिंगची सोशल मीडियावर कायमच चर्चा असते. या जोडीबद्दल जाणून घेण्यास प्रेक्षक देखील कायम उत्सुक असतात. अशातच योगिताने लाडक्या नवरोबाच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्री योगिता चव्हाणने तिचा नवरा सौरभ चौघुलेसाठी इन्स्टाग्रामवर रोमॅंटिक पोस्ट शेअर केली आहे. लाडक्या नवरोबासोबतचा खास व्हिडीओ, फोटो तिने या पोस्टच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर केले आहेत. "जिंदगी से बस एक ही गिला है मुझे की तू बहुत देर से मिला है मुझे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा" असं कॅप्शन देत योगिताने इन्स्टाग्रामवर त्यांचा सुंदर असा व्हिडीओ शेअर केला आहे. योगिताने शेअर केलेल्या या व्हिडीओवर निखिल दामले, रेश्मा शिंदे तसेच ऐश्वर्या शेटे यांसारख्या कलाकारांनी प्रतिक्रिया देत अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
कलर्स मराठीवरील 'जीव माझा गुंतला' या मालिकेच्या सेटवर सौरभ आणि योगिताचे सूर जुळले. त्यानंतर खऱ्या आयुष्यातील प्रवास सुरू केला. ३ मार्च २०२४ रोजी दोघांनी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. दरम्यान, सौरभ-योगिताकडे मराठी कलाविश्वातील एक आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं.