विकी कौशलच्या (Vicky Kaushal) 'छावा' (Chhaava) या हिंदी सिनेमात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही (Santosh Juvekar) झळकला आहे. 'छावा' सिनेमात रायाजीची भूमिका साकारून संतोष जुवेकरने (Santosh Juvekar) प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. मात्र काही दिवसांपूर्वी त्याने अक्षय खन्नाबद्दल (Akshaye Khanna) केलेल्या एका वक्तव्यामुळे चाहत्यांनी त्याला ट्रोल केलं होतं. "छावाच्या संपूर्ण शूटिंगमध्ये मी अक्षय खन्नाशी बोललो नाही. मुघलांची पात्र साकारणाऱ्या कुठल्याच व्यक्तीशी मी बोललो नाही", असं वक्तव्य संतोषने केलं होतं. या वक्तव्यानंतर संतोषला ट्रोल करत अनेक मीम्सही व्हायरल झाले. आता संतोष जुवेकरसाठी Bigg Boss फेम धनंजय पोवार अर्थात 'डीपी दादा' पुढे आला आहे.
संतोषची बाजू घेत धनंजय पोवारनं खास पोस्ट शेअर केली आहे. त्याने संतोषसोबतचा फोटो पोस्ट करत लिहलं, "संतोष याला मी खूप वर्षं पासून ओळखतो. तो मनाने खूप निखळ आहे. सध्या ट्रोल होतोय. पण तुम्ही त्याला चुकीचा समजू नका. तो खूप सध्या विचारांचा आहे. मनाने पूर्ण मराठी संस्कृती जपणारा आहे. मला आशा आहे की तुम्ही सगळेच हे बंद कराल", या शब्दात धनंजय पोवार याने संतोषला पाठिंबा देत ट्रोलिंग थांबवण्याचं आवाहन प्रेक्षकांना केलं.
धनंजय पोवार याच्यासोबतच संगीतकार, गायक, दिग्दर्शक अवधूत गुप्ते याने फेसबूकवर एक भलीमोठ्ठी पोस्ट करत संतोषला पाठिंबा दर्शवला आहे. संतोषनेही ट्रोलिंगवर आपली बाजू मांडली. तो म्हणाला, "अक्षय खन्ना हा माझाही आवडता अभिनेता आहे. आता ट्रोल झालोय म्हणून असं बोलतोय असं नाहीये. लोक म्हणतील की आता सारवासारव करायला आला. पण लोक अर्धवट गोष्टी ऐकतात किंवा मला जे बोलायचं होतं, ते चुकीच्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचलं". दरम्यान, छावा सिनेमानंतर सुरुवातीला संतोषच्या कामाचं कौतुक झालं. मात्र त्याच्या मुलाखतींमुळे तो सतत ट्रोल व्हायला लागला. 'तुझा रोल किती तू बोलतो किती' असं म्हणत त्याच्यावर अनेक मीम्स बनले.