सध्या 'बिग बॉस मराठी ६'ची चांगलीच चर्चा आहे. या सीझनमधील एकापेक्षा एक स्पर्धकांचा सहभाग असून त्यांची चर्चा आहे. 'बिग बॉस मराठी ६' सुरु असतानाच अनेकांना 'बिग बॉस मराठी'च्या आधीच्या सीझनचीही आठवण होत आहे. अशातच 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या सीझनमध्ये सहभागी असलेला आस्ताद काळेने त्यांच्या सीझनमधील एक खास आठवण शेअर केली आहे. जी वाचून तुमच्याही भुवया उंचावतील.
कोणीतरी टकटक केली, आणि....
अभिजात मराठीला दिलेल्या मुलाखतीत आस्ताद म्हणाला, ''मी जिथे झोपायचो ना, म्हणजे हा बेडचा हेडबोर्ड असेल तर त्या कोपऱ्यामध्ये प्लायला थोडंसं भोक पडलं होतं. पहिल्याच दिवशी मला गेल्यागेल्या ते दिसलं. मी बघितलं, तर त्यात डेनिम घातलेला कॅमेरामनचा पाय दिसला. जिवंत माणूस ऑपरेट करायला मागे बसला होता. संपूर्ण सेटवर सात DOP होते. आमच्या सेटवर २५० माणसांचं युनिट होतं. रेशमताईंच्या बेडच्या वरती जी काच होती म्हणजेच वन वे मिरर होता. तिथे तिला रात्री टकटक ऐकायला आली. ती घाबरली आणि हॉलमध्ये जाऊन बसली.''
रेशमने हे आस्तादला सांगितलं. ''तू पण टकटक कर मग'', असं आस्ताद तिला म्हणाला. ''पण याची परवानगी नाहीये'', असं रेशम म्हणाली. ''मग तो जो कोणी असं करतोय, त्यालाही याची परवानगी नाहीये'', असं आस्तादने तिला सांगितलं. पुढे मग रेशम बेडजवळ गेली. पलीकडून टकटक आल्यावर तिनेही तसंच केलं आणि ती पळून गेली. दोन-तीनदा असंच झालं. नंतर त्यांना कळालं की, पलीकडे कॅमेरामन होता. त्याला नंतर काढून टाकण्यात आलं. कारण ही कृती स्पर्धकांशी संपर्क साधण्यासारखी होती. अशाप्रकारे आस्तादने हा खास किस्सा सांगितला.