Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मी त्यांना नादाला लावलं नाही..." ऐश्वर्या-अविनाश नारकरांच्या ट्रोलिंगवर अश्विनी कासारची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 14:21 IST

त्या दोघंही सुजाण आहेत, त्यांना यातून आनंद मिळतो... अश्विनी कासार स्पष्टच बोलली

ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) आणि अविनाश नारकर (Avinash Narkar) या मराठमोळ्या कपलचे अनेक चाहते आहेत. मात्र गेल्या काही काळापासून दोघंही त्यांच्या रील्समुळे ट्रोल होत आहेत. अविनाश नारकर त्यांच्या विचित्र हावभावामुळे ट्रोलिंगला सामोरे जात आहेत. तरी दोघंही या ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करतात. अनेकदा या दोघांसोबत मराठमोळी अभिनेत्री अश्विनी कासारही असते. तिनेच या दोघांना रील्ससाठी नादाला लावलं असं म्हणत तिला दोष दिला गेला. यावर ती पहिल्यांदाच व्यक्त झाली आहे.

'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत अश्विनी कासार म्हणाली, "सोयरे सकळ नाटकात आम्ही एकत्र काम केलं. मी लहानपणापासून त्या दोघांना बघतेय. माणूस म्हणून त्यांच्या सान्निध्यात राहण्याची संधी मिळाली. महत्वाचं म्हणजे ते दोघं कमाल आहेत, खरे आहेत. ते जसे माझ्यासमोर आहेत तसेच पाठीमागे आहेत. अशी माणसं क्वचितच आपल्या आयुष्यात येतात आणि तुम्ही त्यांच्याशी पटकन जोडले जाता. अशा प्रकारे सीनिअर कलाकारच्या पलीकडे आता ते मला माझ्या कुटुंबातील सदस्यच वाटतात. ते माझ्या कुटुंबाशीही तितकेच अटॅच आहत. आम्हाला निव्वळ, निखळ आनंद मिळतो म्हणून आम्ही रील्सला सुरुवात केली. मला लोकांना हात जोडून सांगायचंय की यात कोणीही कोणावरही जबरदस्ती केलेली नाही. गेल्या काही काळापासून मला खूप वाईट वाटत होतं. लोकांचा रोष मी पाहिला. अनेकजण मला असंही म्हणाले की मीच त्या दोघांना नादाला लावलं. नकारात्मकता अनुभवली. त्या दोघीचं खूपच वाईट वाटलं. एकतर ते दोघंही सुजाण आहेत. हा त्यांचा प्रश्न होता त्यांना आनंद मिळत होता म्हणून ते करत होते. अजूनही ते करत आहेत. अभिमानाची गोष्ट ही की माझअयापेक्षा जास्त त्यांना सोशल मिडिया कळलेलं आहे. ऐश्वर्या ताईने त्या पद्धतीने स्वत:ला groom केलं आहे ते कौतुकास्पद आहे. तिने बसून इन्स्टाग्राम अकाऊंट काढलं आणि आज तिचे फॉलोअर्स कुठच्या कुठे आहेत. मी अजून तिथेच आहे. मला खूप छान वाटलं."

ती पुढे म्हणाली, "आम्ही काही रीलसाठी भेटत नाही. तर अगदी असंच भेटतो. मी आणि अविनाश दादा खूप खातो. पण मनात प्रश्न असाही येतो की तुम्ही त्यांची छान कामही पाहिली आहेत ना. अविनाश दादांचं रणांगण नाटक, सोयरे सकळ, ऐश्वर्या ताईची महाश्वेता नावाची मालिका आणि बरंच काही. रील ही त्यांची ओळख नाही. हा त्यांच्या वैयक्तिक आनंदाचा भाग आहे. ज्यांना आवडेल त्यांनी बघा नाहीतर दुर्लक्ष करा. पण नकारात्मकता पसरवण्याचं गणित मला कळत नाही. त्यात मला लक्ष्य केलं याचंही मला फार वाईट वाटलं होतं. आपल्या मनात ती गोष्ट नसते आणि समोरुन तसे आरोप होतात तेव्हा वाईट वाटतं. प्रेक्षकांचं समजू शकते पण आमच्या क्षेत्रातल्याही लोकांकडून जेव्हा मला अशा प्रतिक्रिया आल्या तेव्हा वाटलं की माझ्या कामासाठी कधी तुम्ही मला फोन केला नाही. त्यावर कधीच अभिप्राय दिला नाही त्यामुळे मला थोडंसं खटकलं. तेव्हा मग ऐश्वर्या ताई आणि अविनाश दादानेच माझी समजूत काढली होती."

टॅग्स :मराठी अभिनेताटेलिव्हिजनऐश्वर्या नारकरअविनाश नारकरसोशल मीडियाट्रोल