Shefali Jariwala Death: वयाच्या ४२ व्या वर्षी शेफाली जरीवालाचं निधन झालं. हृदयविकाराचा झटका आल्याने शेफालीने अखेरचा श्वास घेतला. शेफालीच्या अकस्मात निधनामुळे चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली. शेफालीला हृदयविकाराचा झटका आल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. रात्री शेफालीसोबत काय घडलं? तिला हॉस्पिटलमध्ये कसं दाखल करण्यात आलं, या सर्व घटनेची इनसाईड स्टोरी शेफालीच्या बिल्डिंगमधील वॉचमनने सांगितली. याशिवाय मुंबई पोलिसांनीही या घटनेचा तपास केला.
वॉचमनने काय सांगितलं?
शेफाली जरीवाला अंधेरी येथील गोल्डन रेज नावाच्या बिल्डिंगमध्ये राहायची. पती पराग त्यागीसोबत शेफाली राहत होती. या बिल्डिंगचा वॉचमन शत्रुघन महतो याने मध्यरात्री शेफाली सोबत काय घडलेला सर्व घटनाक्रम सांगितला. वॉचमन म्हणाला की, "रात्रीचे १० किंवा सव्वा दहा वाजले होते. त्याचवेळी गेटमधून गाडी निघाली. गाडी आल्यावर मी लगेच गेट उघडला. आपत्कालीन घटना असल्याने गाडी खूप वेगात होती. गाडीच्या काचा काळ्या असल्याने त्यात शेफाली होती की नव्हती हे माहित नाही. मी परवा शेफाली यांना शेवटचं पाहिलं होतं. ती खूप चांगली होती. ती तिच्या पतीसोबत चालायला निघाली होती. त्यांच्यासोबत त्यांचा कुत्राही होता."
"शेफाली सर्वांसोबत खूप चांगलं वागायची. तिने कधीच कोणाला अडवलं नाही. तिचा स्वभाव खूप चांगला होता याबद्दल दुमत नाही. रात्री १ वाजता कोणीतरी आलं आणि त्याने फोटो दाखवून मला विचारलं की, यांना ओळखतोस का. त्यांचा मृत्यू झालाय. मला आधी विश्वास बसला नाही. तो व्यक्ती तिचा मित्र होता. त्यानंतर १ वाजता पोलीस आले आणि मॅडमच्या कूकला चौकशीसाठी घेऊन गेले." अशाप्रकारे शेफालीच्या बिल्डिंगच्या वॉचमनने सर्व घटनाक्रम उलगडला. शेफालीच्या अकस्मात निधनाने तिचे चाहते हळहळ व्यक्त करत आहेत.