गेल्या काही दिवसांपासून सामाजिक वातावरण तापलेलं आहे. नागपूरमध्ये झालेल्या दंगलीतून त्याचाच प्रत्यय येतो. जाळपोळ, तोडफोडीमुळे नागपूरमधलं वातावरण चिघळलं होतं. औरंगजेबाच्या कबरीवरुन हा वाद पेटला आहे. तसंच 'छावा' सिनेमानंतरच औरंगजेबच्या कबरीचा वाद सुरु झालेला दिसत आहे. यासाठी अनेकांनी विकी कौशललाही जबाबदार धरलं. यावर बिग बॉस फेम अभिनेत्याने टिप्पणी केली आहे. विकी नाही तर थर्ड ग्रेड अभिनेत्री याला जबाबदार आहे असं त्याने ट्वीट केलं आहे.
'बिग बॉस १३'मध्ये सहभागी झालेला अभिनेते आणि राजकीय विश्लेषक तहसीन पूनावाला (Tehseen Poonawalla) ट्वीट करत लिहितात, " ज्याने छावा सारखा ब्लॉकबस्टर हिट दिला आणि छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली त्या अभिनेता विकी कोशलला नागपूरमधील दंगलीसाठी जबाबदार धरण्यात येत आहे हे फारच खेदजनक आहे. एखादी कला मग ते सिनेमा असो, पुस्तक असो किंवा सर्जनशीलता असो त्याच्यात दंगल भडकावण्याची ताकद नसते. ही कला फक्त समाजाला आरसा दाखवू शकते ना की आग पेटवू शकते. जर सिनेमात प्रॉब्लेम असेल तर पाहू नका किंवा चांगला बनवा, कोणाला पुस्तक आवडलं नसेल दुर्लक्ष करा किंवा याहून चांगली कथा लिहा. हिंसा करणं हा कोणाचाही अधिकार नाही."
ते पुढे लिहितात, "इथे खरी गुन्हेगार तर तिसऱ्या दर्जाची अभिनेत्री आणि अबु आजमी आहेत. त्यांनीच केवळ उजव्या विचारसरणीच्या लोकांना विरोध करायचा म्हणून निर्लज्जपणे औरंगजेबचा उदो उदो केला. इतकंचन नाही तर महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे आणि तेलंगणाचे आमदार टी राजा यांनीही आगीत तेल ओतलं. लक्षात घ्या, आजमींचे, नितेश राणेंचे आणि टी राजांची मुलं या दंगलीत रस्त्यावर नव्हती. कारण विशेषाधिकार असलेल्या या लोकांनी अराजकता निर्माण केली आणि याचा त्रास गरिबांना सहन करावा लागला. हा द्वेष पसरवणं थांबवूया- जय भवानी, जय शिवाजी, जय हिंद चा नारा देऊया. रमजानच्या या महिन्यात एकमेकांना कुटुंब समजून एकत्र येऊन आलिंगन देऊया. भारत अविभाजितरित्या विकास करो आणि समृद्ध होवो."