टीव्ही अभिनेता आमिर अली (Aamir Ali) रिलेशनशिपमध्ये आहे. पत्नी संजिदा शेखसोबत घटस्फोटानंतर ४ वर्षांनी त्याला पुन्हा प्रेम मिळालं आहे. मॉडेल आणि अभिनेत्री अंकिता कुकरेतीला तो डेट करत आहे. नुकतंच त्याने रिलेशनशिप कबुलही केलं आहे. तसंच पहिल्या पत्नीपासून आमिरला एक मुलगीही आहे. मात्र तिच्याशी काहीच संपर्क नसल्याचा खुलासा त्याने केला आहे. नक्की काय म्हणाला आमिर?
ईटाईम्सशी बोलताना आमिर अली म्हणाला, "मी सध्या चांगल्या स्पेसमध्ये आहे. बऱ्याच काळानंतर मी कोणासोबत तरी आहे. प्रत्येकजण प्रेमासाठी पात्र असतो. तसंच शेवटी आधीच्या नात्यातून बाहेर यावंच लागतं. मी तिच्यासोबत आनंदी स्पेसमध्ये आहे, तिला जवळून ओळखण्याचा प्रयत्न करत आहे. खूप वेगळं वाटतंय, छान वाटतंय. मी याचा आनंद घेत आहे. मी तिला नेहमी गंमतीत एक गोष्ट सांगतो की, मलाही हृदय आहे याची जाणीव करुन दिल्याबद्दल तुझे आभार. आताच सुरुवात झाली आहे पाच महिनेच झालेत. ही नक्कीच कशाचीतरी सुरुवात आहे."
तो पुढे म्हणाला, "मी कधीच प्रेमावरचा विश्वास उडू दिला नव्हता. जेव्हाही कोणी मला विचारायचं तेव्हा मी हेच सांगायचो की प्रत्येकजण प्रेमात पडतो आणि मी सुद्धा सेटल होईन. मलाही कुटुंब हवं आहे आणि मी गेल्या काही काळापासून स्वत:शीच संघर्ष करत होतो. सगळं काही सुरळीत वाटतं पण कधीकधी नक्की काय चाललंय आपल्याला माहित नसतं. गेल्या वर्षी मी अनेकांना भेटलो पण जेव्हा कळायचं की काहीतरी होतंय तेव्हा मी पळून जायचो. मी प्रेमासाठी पात्र नाही असंच मला वाटायला लागलं होतं. मग मी तिला भेटलो आणि एक आठवड्यातच आम्ही कनेक्ट झालो. मला कळत नव्हतं मी असा का वागतोय. नॉर्मल नाही तर भावुक होतोय. मला जाणवलं की मला ही मुलगी आवडतीये."
संजिदा आणि लेक आयराशी बोलणं होतं का यावर आमिर म्हणाला, "मी कोणासोबतच संपर्कात नाही. ते खूपच गुंतागुतीचं आहे. मला तिच्याबद्दल काहीही वाईट बोलायचं नाही. आम्ही दोघांनी आमची एकमेकांचा आदर ठेवला आहे. आम्ही एका सुंदर नात्यात होतो त्यामुळे मी तिच्याबद्दल कधीच काही वाईट बोलणार नाही. लोक आमच्याबद्दल पाहिजे ते लिहितात पण त्याचं मी काहीच करु शकत नाही."