Join us

"ती आता दिसायला..."; पतीने सर्वांसमोर उडवली खिल्ली, स्वरा भास्करचा चेहराच पडला, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 10:37 IST

स्वरा भास्करच्या पतीने सर्वांसमोर अभिनेत्रीच्या दिसण्याची अशी खिल्ली उडवली, की स्वराचा चेहराच उतरला. काय घडलं?

अभिनेत्री स्वरा भास्कर आणि तिचा पती फहाद अहमद सध्या ‘पति पत्नी और पंगा’ या रिअॅलिटी शोमध्ये दिसत आहेत. या शोमध्ये सेलिब्रिटी जोडपी एकत्र येऊन विविध खेळ, टास्क आणि गमतीजमती करतात. अलीकडेच दाखवलेल्या एका एपिसोडमध्ये फहादने स्वराची थट्टा केली. त्याने हसत-हसत तिचं दिसणं आणि तिच्या बोलण्याबद्दल मस्करी केली. हे ऐकून स्वरा लगेचच चिडली आणि त्याला सर्वांसमोरच झापलं. या प्रसंगावर सेटवर मोठा हशा पिकला आणि प्रेक्षकांनाही दोघांची ही मजेशीर नोकझोक खूप आवडली.

नवऱ्याचं बोलणं ऐकून स्वराला धक्का

‘पति पत्नी और पंगा’ या रिअॅलिटी शोमध्ये फहाद अहमद आणि स्वरा भास्कर सहभागी झाले होते. तेव्हा फहादने सर्वांसमोर स्वराची चांगलीच खिल्ली उडवली. तेव्हा संवाद  साधताना फहाद स्वराकडे पाहून म्हणतो की, ''माझ्याकडे हिच्यापेक्षा जास्त अक्कल आहे. आणि आमच्या दिसण्यात फक्त १९-२० चा फरक आहे.'' हे ऐकताच स्वराला चांगलाच धक्का बसतो. फहाद टेलिव्हिजनवर सर्वांसमोर असं काही बोलेल, याची स्वराला कल्पना नसल्यामुळे तिला चांगलाच धक्का बसतो. 

पुढे स्वरा सुद्धा फहादला तगडं उत्तर देताना दिसते. ती म्हणते, ''माझ्यात आणि फहादच्या दिसण्यात १९-२० चा फरक आहे हे ऐकल्यामुळे मला चांगलाच धक्का बसला आहे. मला वाटतं माझा नवरा हॉट आहे. पण तो स्वतःलाच माझ्यापेक्षा हॉट कसं म्हणू शकतो.'' हे ऐकताच फहाद पुढे म्हणतो, ''अगं तूच तर म्हणतेस, आपण दोघे एकसारखे दिसतो. आपण दोघेही भावंडांसारखे आहोत.'' हे ऐकताच स्वरा आणखी चिडते आणि म्हणते, ''अरे त्या गोष्टी मी मस्करीत म्हणते. ते सर्वांना सांगायची गरज नाही.'' अशाप्रकारे स्वरा आणि फहादमध्ये मस्तीखोर संवाद बघायला मिळाला. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

टॅग्स :स्वरा भास्करटेलिव्हिजनटिव्ही कलाकारबॉलिवूड