'बिग बॉस मराठी ५'चा विनर आणि सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतंच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'झापुक झुपूक'चा ट्रेलर पाहून सूरज चव्हाणच्या सिनेमाबाबतची चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. केदार शिंदेंच दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे.
नुकतंच या सिनेमाच्या टीमने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला भेट दिली. 'झापुक झुपूक' सिनेमाची टीम दगडूशेठ गणपतीच्या मंदिरात पोहोचली. श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात सूरज चव्हाण नतमस्तक झाला. तर केदार शिंदेंनीही गणरायाचे दर्शन घेतले. दर्शनानंतर सूरज चव्हाणने मंदिराच्या गाभाऱ्यात "गणपती बाप्पा मोरया" असा जयघोषही केला. याचा व्हिडिओ समोर आला आहे.
'झापुक झुपूक' सिनेमातून सोशल मीडिया स्टार असलेल्या सूरज चव्हाणचा आयुष्यातील संघर्ष दाखविण्यात येणार आहे. अॅक्शन, ड्रामा आणि इमोशनने हा सिनेमा पुरेपूर असणार आहे. सिनेमात सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत असून जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे,पायल जाधव,दीपाली पानसरे, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी अशी सिनेमाची स्टारकास्ट आहे. जिओ स्टुडिओ आणि केदार शिंदेंच्या प्रोडक्शन्सकडून सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. हा सिनेमा येत्या २५ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.