Sunny Deol: अभिनेता सनी देओल याने बॉलिवूड इंडस्ट्रीचा एक काळ गाजवला. सनी देओल त्याच्या आजवरच्या कारकीर्दीत एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. शिवाय बॉलिवूड आघाडीच्या नायिकांसोबतही एकत्रित स्क्रिन शेअर केली आहे. हिंदी सिनेसृष्टीत अॅक्शन हिरो म्हणून ओळख मिळवलेला हा अभिनेता सध्या बॉर्डर-२ या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आला आहे. सध्या सनी देओल या चित्रपटाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देताना दिसतो आहे. अशातच त्यात आता दिलेल्या एका मुलाखतीमध्ये या अभिनेत्याने लेडी सुपरस्टार श्री देवी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याची सगळीकडे चर्चा होताना दिसते.
अलिकडेच सनी देओलने 'झुम' ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याला श्रीदेवीसोबतच्या त्याच्या बॉण्डिंगबद्दल आणि काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. या मुलाखतीत अभिनेत्याला त्याच्या आवडत्या सहकलाकार नायिकांबद्दल प्रश्न विचारण्यात आला आहे. त्याविषयी बोलताना सनी देओल म्हणाला," सगळ्या सहकलाकार नायिकांसोबत माझी चांगली बॉण्डिंग होती.त्यांच्यासोबत माझी ऑन-स्क्रीन केमिस्ट्री चांगली होती,म्हणूनच आ्म्ही साकारलेली पात्रं गाजली."
त्यानंतर पुढे अभिनेता श्री देवी यांच्याबद्दल म्हणाला, "माझं श्री देवी यांच्यासोबत जास्त बोलणं व्हायचं नाही. त्या एक हुशार अभिनेत्री होत्या. आपलं काम कसं उत्तम पद्धतीने करता येईल याकडे त्या विशेष लक्ष द्यायच्या.अगदी शेवटच्या क्षणी त्या आपल्या पात्रामध्ये सुधारणा करत असत. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना नेहमी सावध राहावं लागायचं." असा खुलासा सनी देओलने केला.
दरम्यान, सनी देओलने 'चालबाज' चित्रपटात श्री देवींसोबत काम केलं होतं. मात्र, त्या चित्रपटातील एका गाण्यात श्रीदेवीसोबत नाचण्याची भीती वाटत होती. म्हणून तो चक्क दोन तास सेटवरून गायब झाला होता, असा किस्सा घडला होता.