अभिनेता सनी देओलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये, त्याच्या प्रसिद्ध ‘ढाई किलो का हाथ’या संवादाबद्दल काही खास गोष्टींचा खुलासा केला आहे. एकवेळ अशी आली होती की, सनीला हा संवाद खूप त्रासदायक वाटत होता. 'झूम' ला दिलेल्या एका मुलाखतीत सनी देओलने सांगितले की, ‘ढाई किलो का हाथ’ हा संवाद आता एक ओळख बनला आहे आणि त्याचा त्याला अभिमान आहे. पण सुरुवातीच्या काळात मात्र या संवादामुळे त्याला खूप त्रास व्हायचा.
सनी म्हणाला, "मी जिथे जायचो, तिथे लोक मला हाच डायलॉग बोलायला सांगायचे. अर्थात, माझ्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की, लोकांना हा संवाद इतका आवडला, पण वारंवार तोच संवाद बोलून नंतर थोडं इरिटेट व्हायला व्हायचं. आपल्याला अजून बरंच काही करायचं आहे, असं वाटायचं," असे त्यांनी सांगितले. ‘दामिनी’ चित्रपटातील हा संवाद आजही खूप प्रसिद्ध आहे आणि सनी देओलच्या व्यक्तिमत्वाची ओळख बनला आहे.
'जाट' चित्रपटातही संवादाचा वापर
या संवादाबद्दल आणखी एक मनोरंजक गोष्ट म्हणजे, सनी देओलच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'जाट' चित्रपटातही हा संवाद पुन्हा वापरला. पण सुरुवातीला तो यावर इतका समाधानी नव्हता. 'आयएमडीबी'ला दिलेल्या एका मुलाखतीत सनीने सांगितले की, “मी सुरुवातीला याबद्दल फारसा समाधानी नव्हतो, पण नंतर मला समजले की दिग्दर्शकाला तो संवाद त्या दृश्यात का आवश्यक वाटत आहे.” त्यामुळेच हा फक्त संवाद नसून लोकांच्या मनातील भावना आहे, असा विचार सनीने केला आणि नंतर त्याला त्रास वाटणं कमी झालं. सनी लवकरच 'रामायण' सिनेमात हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे.